महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी -संजीवकुमार गायकवाड – श्री.हेमंत पाटील साहेब खासदार झाल्यावर दिल्लीच्या पहिल्या भेटीत काय बघायचंय हे मी ठरवलं होते.आणि त्याप्रमाणे पहिली भेट NDMC अर्थात न्यू दिल्ली म्युन्सीपल कॉर्पोरेशन च्या शाळे ला भेट दिली.
त्या शाळांबद्दल, केल्या गेलेल्या बदलांबद्दल ऐकलेलं होत, फिल्म्स पण बघितल्या होत्या पण वास्तवात काय आहे हे बघायची उत्सुकता होतीच….आणि खरोखरच शासकीय शैक्षणिक क्षेत्रात इच्छाशक्ती असेल तर काय सकारात्मक बदल होऊ शकतात याचा वास्तुपाठच बघायला मिळाला. खाजगी शाळांना लाजवेल अशी सुसज्ज इमारत आणि मुलांच्या विकासासाठी आवश्यक त्या प्रत्येक गोष्टीची काटेकोर अंमलबजावणी,याचा उत्तम संगम या शाळेत बघायला मिळाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मीना सरांनी हसून स्वागत करून माहिती द्यायला सुरुवात केली.
जागोजागी लावलेले माहिती सुविचाराचे फलक,मुलांसोबतच शिक्षकांसाठीची आचारसंहिता यांनी परिसर सजून गेला आहे.
सगळ्यात लक्षवेधक आहे ती इथली लायब्ररी….शिक्षणाचा आत्मा असलेले हे स्थान अत्यंत परिपूर्ण म्हणावे असेच.या लायब्ररीत सहा सुपर कॉम्पुटर फास्ट इंटरनेट सुविधेसह उपलब्ध आहे.जगाच्या कुठल्याही भाषेतील कोणतेही पुस्तक या कॉम्पुटरवर मुलांना वाचायला मिळते आणि विशेष म्हणजे मुलांना त्यांचा पेनड्राईव्ह आणून त्यावर ही पुस्तकं डाउनलोड करून नेण्याची देखील सवलत उपलब्ध आहे.नर्सरी ते 12 वी पर्यंत असलेल्या वर्गांची पुस्तकं प्रतवारी करून लावली आहेत, बारकोडिंग केलेल्या पुस्तकांची व्यवस्थित नोंद करून मुलांना घरी न्यायची सोय इथे आहे. शासकीय शाळेतील ग्रंथालयात AC वातावरण बघून नवल वाटल्याखेरीज राहत नाही!
अत्यंत स्वच्छ असे मुलामुलींकरिताचे स्वच्छ स्वच्छतागृह बघून कौतुक वाटले. विशेषतः मुलींकरिता मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध आहे.त्यासाठी शाळेकडून मुलींच्या आवश्यकतेनुसार कॉईन्स दिली जातात. विकलांग मुलांचे स्वच्छतागृह वेगळे असून त्यांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन बनविले आहे. विशेष म्हणजे कुठलीच गोष्ट थातुरमातुर दिखाव्यापुरती आणि ठेकेदारांची कमाई व्हावी म्हणून केलेली नाही. कुठलीही डागडुजीची अथवा दुरुस्तीची काम निघाली की सिव्हिल डीपार्टमेंटला मेल करायचा, 48 तासात दुरुस्ती झालीच पाहिजे आणि अत्यावश्यक असेल तर 24 तासात काम पूर्ण झाले पाहिजे असा कडक नियम आहे.
शाळेच्या प्रत्येक कामाची पूर्तता दिल्ली कॉर्पोरेशन च्या विविध विभागांना करावी लागते .त्यामुळे त्यासाठी वेगळा फंड लागत नाही.फक्त मेल केला की कामं चटकन होतात.विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक आणि गणवेश आहे, पुस्तकं बोर्ड पाठवतात , ते शाळेत वितरित होतात तर गणवेशाचे पैसे डायरेक्ट विद्यार्थी किंवा पालकांच्या अकाउंट ला ट्रान्सफर होतात.शिक्षकांचे सतत ट्रेनिंग होत राहतात.सर्वच स्तरातील विद्यार्थी इथे प्रवेश घेतात.केवळ सुविधांमुळे नव्हे तर या शाळांचा शैक्षणिक दर्जाही उत्तम आहे.यावर्षीच्या 10 वीच्या cbse बोर्डाच्या परीक्षेत दिल्ली कॉर्पोरेशन च्या शाळांचा निकाल 95 टक्क्यांच्या वर तर, मी जी शाळा बघितली तिचा निकाल 99.99%इतका लागला.
यासोबतच मुलांच्या इतर गुणांना चालना मिळावी म्हणून सुंदर ओडिटोरिएम प्रत्येक शाळेत आहे. विविध खेळांचे साहित्य मुलांनी क्रीडा नैपुण्य मिळवावे यासाठी आहे.
उल्लेखनीय म्हणजे इथेच एका विभागात बालसंगोपन केंद्र working women असलेल्या आयांसाठी आहे.सहा महिने ते 10 वर्ष वयाची मुलं सकाळी 6 ते रात्री 7 पर्यंत ठेवायची सोय आणि सुविधा उपलब्ध आहे.त्यांच्यासाठी सुंदर बगिचा आणि क्रीडासाहित्य उपलब्ध आहे.
तिथली स्वछता, आवश्यक उपयोगिता, विद्यार्थीकेंद्रीत सोयी सुविधा ,….या सगळ्याच गोष्टी अचंभीत करणाऱ्या आहेत.एकूणच शैक्षणिक स्तर उंचावून अष्टपैलू नागरिक घडविण्यासाठी असे प्रयत्न सर्वच ठिकाणी सर्वच स्तरावर होणे गरजेचे आहे.असे मत सौ.राजेश्री हेमंत पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत व्यक्त केल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. आपल्या कडेही असे बदल करून राज्यातील जिल्हा परिषद शाळांची काया पालट करता येईल का? यासाठी राज्याच्या शिक्षणमंत्री मा. वर्षाताई गायकवाड यांच्या कडे लवकरच मागणी करू असे सांगितले आहे.