Rain News : राज्यात पुढील ५ दिवस या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह धो-धो बरसणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३ मे । राज्यभरात अल्पकाळासाठी उन्हाची तीव्रता वाढून ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढत असल्याने उन्हाळ्याचा हा महिनाही पावसाचाच असेल का, अशी शंका व्यक्त होत आहे. भारतीय हवामान विभागाने मे महिन्याच्या अंदाजात वायव्य भारतात, पश्चिम-मध्य भारताच्या अनेक भागांत या महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, मंगळवारी जाहीर झालेल्या पूर्वानुमानुसार राज्यात गुरुवारी पावसाचा जोर पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण विभागातही याची तीव्रता अधिक असू शकेल.

मुंबईमध्ये मंगळवारी सकाळी काही भागांमध्ये अचानक जोरदार सर मुंबईकरांनी अनुभवली. काही ठिकाणी ढगाळ वातावरणही होते. बुधवारीही मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर गुरुवारी मात्र मेघगर्जना आणि वीजांसह पावसाच्या उपस्थितीचा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर मुंबई आणि पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शनिवारी वातावरण कोरडे असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात गुरुवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर शुक्रवारी याची तीव्रता कमी होऊ शकते. नाशिक, अहमदनगर, पुणे येथे तर मराठवाड्यात नांदेड, लातूर येथे गुरुवारसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी गुरुवारी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि पावसाची तीव्रता वाढू शकते. याशिवाय धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. विदर्भामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात पाचही दिवस यलो अॅलर्ट आहे. उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, सोलापूर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर काही ठिकाणी शनिवारी पावसाचा जोर कमी होऊ शकतो.

पुन्हा तापमानाचा ताप?

पावसाच्या या प्रभावामुळे राज्यात कोकण विभाग वगळता बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीहून लक्षणीय खाली उतरला आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर पुन्हा तापमानाचा ताप अधिक जाणवेल अशी भीती नागरिकांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *