महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ मे । सध्या देशातील तापमानात (temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहेत. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, यावर्षी मे महिन्यात देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी धुक्याची हलकी चादर पसरल्याचे चित्र दिसले. उन्हाळ्यात नागरिकांना पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या देशातील अनेक भागात तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, आता येत्या काही दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं (IMD) वर्तवला आहे.
उत्तर पश्चिम भारतात पुढील तीन दिवसांत तापमान 4 ते 6 अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या महिन्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि धुक्यासारखी स्थिती दिसून आली आहे. पुढील पाच दिवस भारताच्या बहुतांश भागात तापमानात वाढ होणार असली तरी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती येण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
डोंगराळ राज्यांमध्ये तापमानात वाढ
देशातील डोंगराळ राज्यांमध्ये तापमानात वाढ झाली असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली आहे. गुरुवारी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या तापमानात 4 ते 7 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. पुढील पाच दिवसांत मध्य भारतात कमाल तापमानात 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर पुढील 24 तासांत पूर्व भारतात कमाल तापमानात कोणताही विशेष बदल होणार नाही. त्यानंतर 3 ते 5 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम भारतातही पुढील दोन दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही, मात्र त्यानंतर तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ अपेक्षित आहे.
122 वर्षांनंतर दिल्लीत मे महिन्यात वातावरणात एवढा बदल
तब्बल 122 वर्षानंतर दिल्लीत मे महिन्यात तापमानात एवढी घट झाल्याचे दिसून आले. यापूर्वी 1901 मध्ये मे महिन्यात एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली होती. गुरुवारी सकाळी दिल्लीतील किमान तापमान 15.8 अंशांवर नोंदवले गेले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 1901 नंतर मे महिन्यातील ही तिसरी सर्वात थंड सकाळ होती.