‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार, कारण…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ मे । दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांना त्यांच्या लाडक्या स्टारला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. सुशांतचा एक चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. नीरज पांडे दिग्दर्शित महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक चित्रपट ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ लोकांना खूप आवडला होता. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतने महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुशांत सिंह राजपूतचा ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एक नाही तर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपट पुढच्या आठवड्यात १२ मे रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहता येणार असून हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे.

सुशांत सिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. भारतीय क्रिकेट कर्णधार धोनीच्या जीवनावर आधारित, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ला जगभरातील भारतीय चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले होते. आता सात वर्षांनी पुन्हा एकदा धोनीचं आयुष्य व दिवंगत सुशांतचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. क्रिकेटच्या जादुई क्षणांचा आनंद चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पुन्हा लुटता यावा, हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यामागचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत, कियारा अडवाणी, दिशा पाटनी, अनुपम खेर आणि भूमिका चावला यांच्याही भूमिका होत्या. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *