राजीनामा मागे घेताना शरद पवारांच्या मागे बसलेल्या कोण ? पहाटेच्या शपथविधीच्या वेळी त्यांनी काय केलं होतं ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ मे । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनभावनेचा आणि कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचा आदर राखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. शुक्रवारी त्यांनी यासाठी एक सविस्तर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या मागे सोनिया दुहान या राष्ट्रवादीच्या नेत्या बसल्या होत्या. सोनिया दुहान हे नाव चर्चेत आलं आहे. कारण पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसंच शिंदे गटाचे आमदार जेव्हा गोव्यात आले होते तेव्हाही त्यांना एक जबाबदारी देण्यात आली होती. शरद पवारांच्या मागे असलेल्या या सोनिया दुहान कोण? त्यांनी काय केलं होतं हे जाणून घेऊ.

कोण आहेत सोनिया दुहान?
सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. तसंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याही आहेत. शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याची जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत सोनिया दुहान या शरद पवारांच्या मागेच बसल्या होत्या. सोनिया दुहान या हरियाणामधल्या हिसारच्या रहिवासी आहेत. तीन भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या आहेत. हिसारमध्ये सोनिया यांनी शालेय शिक्षण घेतलं आहे. यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून Bsc. केलं आहे. त्यानंतर त्या अंबाला या ठिकाणी आल्या. वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचं वास्तव्य पुण्यात होतं. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्या. दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं होतं. सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या महासचिवही होत्या. युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

पहाटेच्या शपथविधीच्या वेळी सोनिया दुहान यांनी काय केलं?
अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हे गायब होते. ज्यामध्ये दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील यांचा समावेश होता. भाजपाच्या गळाला लागलेल्या या सगळ्या आमदारांना परत आणण्याचं काम सोनिया दुहान यांनी केलं असं सांगितलं जातं. गुरुग्राम या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमधून सोनिया दुहान यांनी या सगळ्यांना परत आणलं. शरद पवार यांना २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी एका आमदाराचा मेसेज आला. आम्हाला दिल्लीतल्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये कोंडल्याचा उल्लेख त्यात होता. त्यावेळी सोनिया दुहान आणि त्यांचा सहकारी धीरज शर्मा यांनी या आमदारांचं लोकेशन शोधलं. गुरुग्रामच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये हे चार आमदार असल्याचं त्यांना कळलं. त्या हॉटेलमध्ये सोनिया दुहान आणि धीरज शर्म गेले. तिथे भाजपाचे १०० ते १५० कार्यकर्ते होते. हे सगळेजण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.त्यानंतर सोनिया आणि धीरज यांनी हॉटेलच्या मागच्या दाराने जिथे कुठेच सीसीटीव्ही वगैरे नव्हते तिथून या आमदारांना खुबीने बाहेर काढलं. या आमदारांना शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आणण्यात आलं.

शिंदे गट फोडण्यासाठी गोव्यालाही गेल्या होत्या सोनिया दुहान
मागच्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि चाळीस आमदारांनी त्यांना साथ दिली. गुवाहाटीतून गोवा या ठिकाणी आलेले आमदार गोव्यातल्या ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळीही बोगस कागदपत्रं देऊन श्रेया कोठीवाल आणि सोनिया दुहान या दोघींनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा तो प्रयत्न फसला. या दोन प्रसंगापासून सोनिया दुहान या शरद पवारांच्या विश्वासू तरुण सहकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. त्या काल शरद पवार यांच्या मागच्याच खुर्चीवर बसल्या होत्या. त्या कोण आहेत याची सोशल मीडियावर चर्चा आधीही रंगली होती तशीच आताही ती रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *