महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ मे । मुंबईत उन्हाळा सुरु झाला किंवा शाळा सुट्ट्या लागल्या की पालक मुलांना फिरायला नेण्यासाठी घराबाहेर पडतात. उन्हाळा असल्याने रिसॉर्ट असणाऱ्या ठिकाणांनाच सर्वांची जास्त पसंती असते. यामुळेच पालकांसह अनेक तरुणांची पावलं अलिबाग, गोराई इकडे वळत असतात. दरम्यान, यातील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे Essel World…90 आणि 2000 च्या दशकातील फार कमी तरुण असतील ज्यांनी Essel World ला भेट दिली नसेल. मात्र हेच Essel World सध्या बंद करण्यात आलं आहे. यामुळे अनेकजण भावूक झाले असून, ट्विटरला आपल्या आठवणी शेअर करत आहेत.
“एस्सल वर्ल्डमे रहूंगा मै, घर नही नही जाऊंगा मै” हे वाक्य आजही अनेकांच्या लक्षात आहे. 90 च्या दशकातील तरुणांनी हे वाक्य सुरात नाही म्हटलं तर आश्चर्यच. शाळेची पिकनिक असो किंवा सुट्ट्या हे ठिकाण त्यांच्यासाठी ठरलेलं असायचं. पण नुकतंच Essel World ने पुढील नोटीस येईपर्यंत कामकाज बंद करत असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे अनेकजण भावूक झाले आहेत.
Essel World ने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील हे मनोरंजन पार्क तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आलं आहे. “आम्ही पुढील नोटीस येईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपासाठी कामकाज बंद करत आहोत,” अशी घोषणा Essel World ने केली आहे. यानंतर ट्विटरला एकच चर्चा सुरु झाली आहे. अनेकांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. तसंच काहींनी कदाचित काहीतरी चांगलं करण्यासाठी त्यांना तात्पुरतं बंद केलं असावं असं मत मांडलं आहे.
मुंबईतील गोराई येथे Essel World आहे. तब्बल 22 एकरात वसलेल्या Essel World मध्ये वॉटर किंग्डम, बर्ड पार्क, स्केटिंग रिंक, राइड्स, फूड कोर्ट्स अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या बालपणाशी जोडलेलं असल्याने अनेकांनी Essel World बंद करणं भावूक करत आहे.