Ujjwal Nikam: राजकारणात येणार का? उज्ज्वल निकम यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मे । ‘अडीच वर्षांपूर्वी मला जळगावातून खासदारकीची ऑफर आली होती. नंतरही दोन-तीन राजकीय पक्षांनी आवतण दिले होते. परंतु, राजकारण हा माझा प्रांत नाही. त्याविषयी फार गांभीर्याने विचार केला नाही. कारण, राजकारणासाठी पैसे लागतात. केवळ लोकांच्या शाबासकीने काही होत नाही,’ अशी स्पष्टोक्ती ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी येथे केली.

चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात अॅड. निकम यांची विश्वास ठाकूर यांनी मुलाखत घेतली. यातील शेवटचा प्रश्न निकम यांचे पुत्र अनिकेत यांना विचारण्यास सांगण्यात आले. अनिकेत यांनी ‘राजकारणात याल का?’ असा प्रश्न विचारल्यावर अॅड. निकम यांनी राजकारणाविषयीचे मत स्पष्ट केले. कुसुमाग्रज स्मारक येथे रविवारी हा कार्यक्रम झाला.

‘१९९३चा बॉम्बस्फोट खटला लढविण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालय पाहिलेही नव्हते. युक्तिवाद करताना एकसुरी बोलल्यास न्यायाधीशांना कंटाळा येऊ शकतो. संस्कृत श्लोकांचा वापर करून, आवाजात चढउतार करून बोलल्यास युक्तिवाद प्रभावी होतो. कसाबच्या फाशीपेक्षाही त्याच्या पाठीशी असलेल्या लष्कर-ए-तय्यबा व पाकिस्तानी सैन्याचा मुखवटा फाडायचा होता,’ असे अॅड. निकम म्हणाले.

‘न्यायालय हा लोकांसाठी आशेचा शेवटचा किरण असून, न्यायव्यवस्थेबाबत सामान्यांच्या मनात शंका येणे ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांना कोठेही नियुक्ती दिली जाऊ नये,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

माझ्या अँजिओप्लास्टीनंतर कुख्यात गुन्हेगार अबू सालेमने तुरुंगातून हिंदीतून दीड पानी पत्र पाठवले व ‘काळजी घ्या’ असे सांगितले, हे प्रथमच येथे जाहीरपणे सांगत असल्याचे अॅड. निकम म्हणाले. गावित भगिनींना फाशी झाल्यानंतर न्यायालयाबाहेर पाच-सहा वर्षांची मुले साखर वाटत असल्याचे पाहून, तसेच कसाबला फाशी झाली, तेव्हा सर्वाधिक समाधान वाटल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *