महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मे । पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे (द्रुतगती महामार्ग) आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून घाटात एकत्र येणारी वाहतूक कमी करण्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील वर्षीच्या मार्चपासून वाहनचालकांना या रस्त्याचा वापर करता येणे शक्य होणार आहे. घाटात सातत्याने होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याने तो लवकर पूर्ण व्हावा, यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) प्रयत्न करण्यात येत आहेत.
पुणे-मुंबई दरम्यान वेगवान प्रवासासाठी एक्स्प्रेस-वेचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषत: शनिवार-रविवार आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीत एक्स्प्रेस-वेवरील घाटातला टप्पा पार करण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्याचे काम सध्या वेगाने केले जात असून, आठ किमीचे दोन बोगदे आणि मोठा दरी पूल ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. त्यातील बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून, दरीपुलाचे काम (व्हायडक्ट) प्रगतीपथावर आहे.
महत्त्वाचे…
— ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे सध्या ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे.
— उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आणखी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार.
— बोगद्यांची कामे पूर्ण झाली असून, बोगद्यांतील रस्ते बांधण्याचे काम सध्या सुरू आहे.
— दोन पुलांपैकी एका पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या दरीपुलाची उंची १८० मीटर असून, लांबी ५५० मीटर एवढी आहे.
अंतर ४५ मिनिटांनी होणार कमी
एक्स्प्रेस-वेवर खालापूरच्या पुढे १.६ किलोमीटरचा आणि लोणावळ्याच्या दिशेने ८.९ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे हे या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या दोन्ही बोगद्यांच्या दरम्यान दरी पूल आहे. खोपोलीपासून ते लोणावळ्यापर्यंतच्या घाटाचे अंतर २२ किलोमीटरचे आहे. घाटातील गर्दी टाळण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ तयार केली जात आहे. त्यामुळे आठ ते १० किलोमीटरचे अंतर आणि ४५ मिनिटांचा कालावधी वाचणार आहे.
लॉकडाउनच्या काळात या कामाला फटका बसला होता. त्यानंतर वेगाने कामे केली जात असून, बोगद्यांतील कामे पुढील काही महिन्यांत पूर्ण होतील. त्यानंतर दरी पुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून पुढील वर्षी मार्चपासून हा संपूर्ण रस्ता पुणे-मुंबई दरम्यानच्या प्रवासासाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे.
– राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, रस्ते विकास महामंडळ