महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मे । CSK vs DC IPL 2023 : आयपीएलचा यंदाचा मोसम आता अंतिम टप्प्यात पोहचत आहे. याचसोबत प्ले ऑफसाठीही जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर चेन्नई सुपरकिंग्स – दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आज चेन्नई येथे आयपीएलची लढत रंगणार आहे.
महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपरकिंग्सचा संघ सातव्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. डेव्हिड वॉर्नरचा दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या विजयासह प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल.
चेन्नई संघातील प्रमुख फलंदाजांनी या स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. ॠतुराज गायकवाड (३८४ धावा), डेव्होन कॉनवे (४५८ धावा), शिवम दुबे (२९० धावा) व अजिंक्य रहाणे (२४५ धाव) यांनी धावांचा पाऊस पाडला आहे. निर्णायक क्षणी शानदार फलंदाजी करून चेन्नईला विजय मिळवून दिला आहे. मात्र चेन्नईला मधल्या फळीची चिंता आहे.
मोईन अली, रवींद्र जडेजा व अंबाती रायुडू या तीन फलंदाजांना अद्याप सूर गवसलेला नाही. याचा फटका त्यांना आगामी लढतींमध्ये बसू शकतो. महेंद्रसिंह धोनीने जेव्हा जेव्हा फलंदाजी करायला मिळालीय तेव्हा तेव्हा संघासाठी मोलाच्या धावा केल्या आहेत.
चेन्नईच्या गोलंदाजांकडून आतापर्यंत प्रभावी कामगिरी झाली आहे. लसिथ मलिंगासारखी गोलंदाजी ॲक्शन असणारा मथिशा पथिराना हा त्यांच्यासाठी ट्रम्पकार्ड ठरत आहे. त्याने सात सामन्यांमधून १० फलंदाजांना बाद केले आहे. तुषार देशपांडे याने ११ सामन्यांमधून १९ फलंदाज बाद केले आहेत; पण त्याला धावांचा ओघ रोखावा लागणार आहे. फलंदाजीत अपयशी ठरलेला रवींद्र जडेजा गोलंदाजीत ठसा उमटवत आहे. त्याने १५ फलंदाज बाद केले आहेत. मोईन अलीने ९, तर माहीश तीक्षणाने ७ फलंदाज बाद केले आहेत.
दिल्लीच्या संघाला सुरुवातीला सलग पाच लढतींमध्ये हार पत्करावी लागली होती; पण मागील पाचपैकी चार लढतींमध्ये विजय मिळवण्यात या संघाला यश मिळाले आहे. दिल्लीने मागील दोन लढतींत गुजरात व बंगळूर या संघांनाही पराभवाचा धक्का दिला आहे.