महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मे । देशाच्या बहुतांश भागात अवकाळी पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून बहुतांश भागातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले जात होते. मात्र आता येत्या काही दिवसात देशातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. (Latest Marathi News)
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात देशातील अनेक भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही भागात 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान नोंदवले जाऊ शकते.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण आठवड्यात देशातील बहुतांश राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील. तसेच 13 मे रोजी पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र त्यामुळे तापमानात घट होणार नाही.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बुधवार, 10 मे रोजी दिल्लीत (Delhi) कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय 10 मे रोजी राज्याच्या काही भागात कमाल तापमान 42 ते 44 अंशांपर्यंत नोंदवले जाऊ शकते. (Weather Update)
महाराष्ट्रातही तापमानाचा पारा वाढणार
विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढणार आहे. विदर्भातील नागपूरसह (Nagpur) अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात 5 ते 7 अंशांची वाढ होऊन पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण एप्रिल महिना आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत उन्हाळ्यावर मात केली होती. मात्र आता राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार आहे.