महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मे । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच गुरूवारी येणार आहे. शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी देव पाण्यात घालून बसलेले असताना पृथ्वीराज चव्हाणांनी ठाकरेंना अपशकून केलाय. निकाल काहीही लागो ठाकरेंचं सरकार पुनःप्रस्थापित होणं कठीण असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
सुप्रीम कोर्ट निकाल देताना 16 आमदारांना अपात्र करेल आणि जुनं उद्धव ठाकरे सरकार पुनर्प्रस्थापित करतील या आशेवर ठाकरे गट आहे. ठाकरेंना आता शेवटची आशा सुप्रिम कोर्टाकडून आहे, त्यामुळेच उद्धव ठाकरेंसह त्यांच्या गटाचे नेते निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. पण ठाकरे गटाच्या आशेवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पाणी फेरल्यासारखं केलंय. सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजुनं लागला तरी कोर्ट उद्धव ठाकरेंना पुनर्प्रस्थापित करणार नाही, असं चव्हाणांनी सांगितलंय.
याआधीही पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरं न जाता चूक केल्याचं विधान केलं होतं. उद्धव ठाकरे बहुमताला सामोरं गेले असते तर शिंदेंसोबतच्या आमदारांना त्यांच्याविरोधात मतदान करावं लागलं असतं. उद्धव ठाकरे फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते तर शिंदेंकडच्या आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केलं, हे स्पष्ट झालं असतं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते.