महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मे । राज्यातील सत्तासंघर्षावर आज, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ निकाल देणार आहे. न्यायालयाच्या ‘हायव्होल्टेज’ निकालाकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणार्या 16 आमदारांच्या सदस्यत्वाच्या वैधतेबाबत घटनापीठ निकाल सुनावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य या निकालाने निश्चित होणार असल्याने या हायव्होल्टेज निकालाविषयी उत्सुकता वाढली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता निकाल सुनावला जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील बंडामुळे निर्माण झालेला घटनात्मक पेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता आणि यामुळे न्यायालयात उभय बाजूंकडून जोरदार वाद-प्रतिवाद झाला होता. खटल्यातील अनेक पैलू घटनात्मक मुद्द्याशी संबंधित असल्याने या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागले होते. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे, नीरज कौल आदींनी युक्तिवाद केला होता; तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी या दिग्गजांनी बाजू मांडली होती. दुसरीकडे, राज्यपालांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली होती.
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत भाजपच्या मदतीने सत्ता काबीज केली होती. त्यानंतर लगेचच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. शिंदे आणि ठाकरे गटांकडून वेगवेगळ्या स्वरूपाच्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. ऑगस्ट 2022 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवले होते. त्यानंतर सलग सुनावणी होऊन 16 मार्च 2023 रोजी घटनापीठाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी घटनापीठ निकाल देणार आहे. घटनापीठातील एक न्यायमूर्ती एम. आर. शहा हे येत्या 15 मे रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे तत्पूर्वीच निकाल लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अपेक्षेनुसार, 11 मे रोजी हा निकाल जाहीर केला जाणार आहे.राज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी देणारे हे प्रकरण असल्यामुळे त्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.