पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये हंगामातील सर्वोच्च तापमान नोंद ; तब्बल एवढ्या अंशांनी चढला पारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मे । कोरेगाव पार्कने कमालच केली. गुरुवारी या भागाचा पारा तब्बल 44.4 अंशांवर गेला होता. दिवसभर शहरात अंगाची लाही लाही करणारे ऊन असल्याने पुणेकर हैराण झाले. तळपत्या उन्हाने बाजारात, रस्त्यावर दुपारी गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसत होते. या भयंकर उष्णतेमुळे माणसांसह जनावरांच्या घशाला कोरड पडल्याने ते पाणी पिताना दिसले.

हवामान विभागाने गुरुवारी मध्य महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. त्याची सुरुवात पुणे शहरातील कोरेगाव पार्क या भागाने केली. गुरुवारी राज्यात जळगाव 44.8 तर कोरेगाव पार्क 44.4 अंशांवर गेले. ही लाट अधिक तीव्र होणार असल्याने हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. शहरात तापमानाचा पारा यंदा प्रथमच 44 अंशांवर गेल्याने डॉक्टरांनीही दुपारी उन्हात बाहेर पडू नका, सतत पाणी, सरबत प्या असा सल्ला दिला आहे.

शहराचे चित्रच बदलले..
गुरुवारी दुपारी शहरात फेरफटका मारला असता उष्णतेच्या झळांनी नागरिक अक्षरशः हैराण झाल्याचे दिसले. बाजारात ठिकठिकाणी दुकानांवर चादरी लावताना दिसले. तर दुकानाच्या आत कुलर, पंख्यांचा वेग वाढला होता. रस्त्यावरची गर्दी कमी झाली होती. विक्रेते सतत पाणी पित होते, तर मुकी जनावरे, पक्षी देखील पाणवठ्याच्या शोधात दिसत होते.

गुरुवारी दुपारी इतका उकाडा होता की, माणसासह पक्षीही तहानेने व्याकुळ झाले होते. नारायण पेठेत एका पाणवठ्यावर कावळा आला. मातीच्या भांड्यात भरलेले पाणी पाहून त्याला हायसे वाटले. त्याने चोचीने गटागटा पाणी पित अशी तहान भागवली.

कोरेगाव पार्कचे तापमान गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास अपडेट झाले. 44.4 अंश असा आकडा अधिकार्‍यांनी टाकला. तोच ‘हे तापमान चुकले तर नाही ना नक्की तपासा’, ‘तेथील यंत्र कॅलिब्रेटेड आहे ना’, असा प्रश्नांचा भडिमार अधिकार्‍यांवर सुरू झाला. त्यावर जबाबदार अधिकार्‍याचे उत्तर आले, ‘हे तापमान बरोबर आहे. या भागात ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असल्याने ते अचूक आहे.’

कोरेगावचा पारा का वाढतोय?…
आजवर दोन वेळा 44 अंशापार
29 एप्रिल 2023 – 44.2
11 मे 2023 – 44.4

यंदा सलग 32 दिवस 41 अंश
फेब्रुवारी 2023 – 15 दिवस पारा 41 ते 42 अंश
मार्च, एप्रिल 2023 – एकूण 10 दिवस : 41 अंश
मे 2023 – सलग 7 दिवस 42 अंश

अनुपम कश्यपि (अंदाज विभाग प्रमुख, पुणे वेधशाळा)

प्रश्न : कोरेगाव पार्कचे तापमान किती वेळा 44 अंशांवर गेले…?
यंदा दोन वेळा गेले आहे. मात्र याला अधिकृत रेकॉर्डचा दर्जा नाही.

प्रश्न : रेकार्ड नसण्याचे कारण काय?
आमच्या नियमात मानक नावाचा प्रकार असतो. पुण्याचे मानक हे शिवाजीनगर आहे, त्यामुळे तेथील तापमान शहराचे म्हणून गृहीत धरले जाते. कोरेगाव पार्कचा पारा मानकात मोडत नाही. तेथील तापमान खरे असले तरीही ते मानकात नसल्याने रेकार्डमध्ये मोडत नाही.

असा करा बचाव..
भरपूर पाणी, सरबत, ताक प्या.
सुती कपडे घाला.
छत्री, रुमाल, टोपी, गॉगल वापरा.
थंड जागेत बसून काम करा.
जनावरे, पक्षी यांना थंड जागेत ठेवा.

हे करू नका…
काम नसेल तर दुपारी
1 ते 4 घराबाहेर पडू नका.
उन्हात खूप लांब जाऊ नका.
थंड जागेतून एकदम
उन्हात जाऊ नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *