महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी : ओमप्रकाश भांगे – पुणे येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पिटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिले.
अजित पवार यावेळी म्हणाले की, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे व दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती आणणे, हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून हळूहळू अर्थचक्राला गती देणे आवश्यक आहे. याकामी नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. अनेकदा काही ठिकाणी बेशिस्त दिसते. त्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाया नियमितपणे करून शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. विविध यंत्रणांच्या समन्वयातून यासाठी प्रयत्न व्हावेत. लॉकडाऊन संदर्भातील नियम, केंद्र व राज्य शासनाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचना, तसेच पुणे जिल्हा व शहरातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षिततेसाठी नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. उद्योगांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. रोजगार उपलब्धेतसाठी उद्योग-व्यवसाय सुरु करून जनजीवनात सुरळीतता आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावे, यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्योग, व्यवसाय सुरू करताना सुरक्षितताही सांभाळली पाहिजे. हे लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचना अजित पवार यांनी सबंधित यंत्रणांना दिल्या.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून व निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरु करता येतील, याचा निर्णय लवकरच घेऊ. शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी प्रयत्न केले जातील व विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेण्यात येईल. ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ तसेच तातडीच्या साधनसामुग्रीच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर असलेल्या प्रस्तावाना मंजुरी देण्यात येईल. राज्य शासनाकडून आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यासोबतच स्त्राव तपासणी क्षमता, पॉझीटिव्ह रुग्णसंख्या स्थिती, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या, कंन्टेनमेंट झोननिहाय स्थिती, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, जेष्ठ नागरिकांची तपासणी, शाळा सुरू करण्यापूर्वी तसेच शाळा सुरू झाल्यानंतरची काळजी, उपचारसुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.