महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ मे । राज्यात मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे तापमानात काही अंशी घट झाली होती. दरम्यान मागच्या चार दिवसांत राज्याचा पारा तापल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यातील सर्वात उच्चांकी तापमान भुसावळ येथे नोंद झाली आहे. हॉटसिटी भुसावळात वैशाख वणवा पेटला आहे. सलग पाचव्या दिवशीही शहराचे कमाल तापमान 42 अंशांच्या वर राहिले. तर शुक्रवारी शहरात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक 45.7 अंश तापमानाची नोंद केंद्रीय जल आयोगाने केली आहे.
सूर्य आग ओकत असल्याने शहरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. तर बाजारपेठ भागातील रस्ते दुपारी निर्मनुष्य होत असून अघोषितची संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. तापमान 13 मे पर्यंत असेच राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे.
हॉटसिटी भुसावळातील तापमानाचा पारा एप्रिल महिन्याच्या अखेरीस 36 अंशांपर्यंत घसरला होता. तर गेल्या रविवारी (दि.07) तापमान 40.5 अंशांवर होते. सोमवारपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सलग पाचव्या दिवशीही शहराचे तापमान 42 अंशांवर पोहोचले आहे. काल (दि.12) शुक्रवारी शहराचे कमाल तापमान यंदाच्या मोसमातील सर्वाधिक 45.7 अंशांवर पोहोचले.
आज (दि.13) राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानाचा पारा ४० अंशापार गेला असेल आणि तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.5 अंशापेक्षा अधिक वाढ झाली असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. शुक्रवारी धुळे येथे 43.6, अकोला आणि वर्धा येथे 43.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहे.
बंगालच्या उपसागरातील ‘मोचा’ चक्रीवादळ लगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून दक्षिण आंध्र प्रदेशापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.