महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मे । केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने आता दोन हजारांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ मेपासून लोकांना बॅंकेतून नोटा बदलून घेता येणार आहेत. पण, एका व्यक्तीला दररोज केवळ दहा नोटाच बदलून मिळणार आहेत. तुर्तास नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण निर्णय जाहीर केला. चलनातून जुन्या ५०० व एक हजाराच्या नोटा बाद केल्या जातील, असे जाहीर केले. ३० डिसेंबर २०१६ पर्यंतच बँक खात्यात हे चलन भरण्याची मुदत दिली होती.
आता पुन्हा चलनातील दोन हजारांची नोट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नवीन नोटा आल्यानंतर सर्वच बॅंकांना ‘एटीएम’मधील ड्रॉव्हर बदलावे लागले होते. पूर्वीच्या नोटा आणि नोटाबंदीनंतर आलेल्या नोटांमध्ये खूपच फरक होता. दोन हजारांच्या नोटा सर्रास बाजारात पहायला मिळत नव्हत्या. कोट्यवधींच्या नोटा ना एटीएममध्ये ना व्यवहारात, अशी स्थिती होती. त्यामुळे त्या नोटा नेमक्या गेल्या कोठे, या प्रश्नाचे उत्तर बॅंक अधिकाऱ्यांना मिळतच नव्हते. आता त्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय झाल्याने सोलापूर जिल्ह्यात नेमक्या किती नोटा आहेत, ही बाब समोर येणार आहे.
पावसाळ्याची सुरवात साधारणत: १५ जूननंतर होते. अशावेळी २३ मे ते ३० सप्टेंबर या काळात दोन हजारांच्या नोटा बदलाव्या लागणार आहेत. नोव्हेंबर २०१६ च्या नोटाबंदीप्रमाणे आता नागरिकांची नोटा बदलण्यासाठी गर्दी होणार नाही, याची दक्षता बॅंकांना घ्यावी लागणार आहे. तरीपण, त्या नोटा फारशा नसल्याने पूर्वीसारखी गर्दी होणार नाही, असे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नोटा बदलून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.