पुणे पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा धडाका ; पुण्यातील 24 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का; 17 सराईत स्थानबद्ध

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मे । पुणे शहर परिसरात गुन्हेगारी कृत्य करीत धुमाकूळ घालणाऱ्या 24 गुन्हेगारी टोळ्यांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोकका) कारवाई केली. तर, वारंवार गुन्हे करणाऱ्या 17 सराईतांना राज्यभरातील विविध कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर होणारी प्रतिबंधात्मक कारवाई, पायी पेट्रोलिंग आदींमुळे शहरातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली आहे.

चेन स्नॅचींग, लुटमार, घरफोड्या ते खूनी हल्ले शहरात वाढती गुन्हेगारी पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे. यांसारख्या गुन्ह्यात उदयोन्मुख आणि पाहिजे आरोपींची संख्या अधिक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी अशा गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाईचा धडाका लावला आहे. पोलीस आयुक्तांनी सूत्रे हाती घेतल्यापासून शहरातील एकूण 24 गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केली आहे.

काही दिवसांपूर्वीच शहरातील वडारवाडी भागात पांधरा ते वीस जणांच्या टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड केली होती. अगदी काही दिवसांत या टोळीवर मोक्का लावण्यात आला. तर, नुकतेच खडकी भागात दहशत पसरविणाऱ्या इराणी टोळीवर 24 वी मोक्का कारवाई करण्यात आली. अनेक सराईत आरोपींवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येत आहे. अशा रेकॉर्डवरील सतरा जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार हाती घेतल्यापासून शहरात बेसिक पोलिसिंगवर भर दिला आहे. याअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात पायी पेट्रोलिंग करण्यात येत आहे. तर, महिनोन्महिने गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना शोधून काढत त्यांना अटक करण्यात येत आहे. या सर्वांमुळे शहरातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली आहे.

गुन्ह्यातील अल्पवयीनांचे समुपदेशन

गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक करवाई करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत असले तरी अनेक गुन्ह्यात अल्पवयीनांचा सहभाग आढळून येत आहे. या पार्शवभूमीवर गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांना आता समुपदेशन देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *