महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ मे । राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज ( दि. 22) ‘आयएलएफएस’ प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात त्यांची चौकशी होणार आहे. जयंत पाटील यांना पाठींबा दर्शवण्यासाठी सध्या ठिकठिकाणी फलक उभारण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. (NCP leader Jayant Patil )
आयएलएफएस कंपनीच्या व्यवहारांची ‘ईडी’कडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. मनी लाँड्रिंग झाल्याच्या संशयावरुन पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश हाेता. कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्याचा काही संदर्भ या नोटीसी मागे आहे का अशी चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात सुरू आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (IL&FS) ही एक भारतीय राज्य-अनुदानित पायाभूत सुविधा विकास आणि वित्त कंपनी आहे. IL&FS ची स्थापना 1987 मध्ये “RBI नोंदणीकृत कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी” म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (UTI) यांनी प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वित्त आणि कर्ज प्रदान करण्यासाठी या कंपनीची स्थापना केली हाेती.