शरीराच्या ‘या’ वासाकडे सर्वाधिक आकर्षित होतात मच्छर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मे । डासांपासून मलेरिया, डेंग्यू, झिका, चिकुनगुनिया यासारख्या अनेक घातक रोगांचा फैलाव होत असतो. त्यामुळे त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जातो. मुळात डास माणसाकडे कशाप्रकारे आकर्षित होतात याबाबतही संशोधन केले जात असते. आता अमेरिकन संशोधकांनी म्हटले आहे की पनीर, दूध, क्रीम आणि दह्यात आढळणार्‍या काही विशिष्ट आम्लांमुळे डास मानवी शरीराच्या गंधाकडे आकर्षित होतात.

जॉन हॉपकिन्स मलेरिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी झाम्बियामध्ये माचा रिसर्च ट्रस्टच्या साथीने ‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात याबाबतचा रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये कोणत्या प्रकारचा मानवी गंध डासांना सर्वाधिक आकर्षित करतो याची माहिती देण्यात आली आहे. संशोधनादरम्यान एका पिंजर्‍याचा वापर करण्यात आला व त्यामध्ये आफ्रिकेतील मलेरिया फैलावणारे डास भरण्यात आले. अर्थात हे डास मलेरियाने संक्रमित नव्हते.

सहा स्वयंसेवकांना या प्रयोगात समाविष्ट करून घेण्यात आले. हे सर्वजण एका तंबूत झोपले होते, तेथून एका लांब ट्यूबच्या मदतीने त्यांचा श्वास आणि शरीराचा गंध डासांच्या पिंजर्‍यात सोडण्यात आला. प्रयोगावेळी आढळले की डास लिम्बर्गरसारख्या ‘दुर्गंधीयुक्त’ चीजमधील एक घटक ‘ब्यूटिरिक अ‍ॅसिड’सह एअरबोर्न कार्बोक्जिलिक अ‍ॅसिडकडे सर्वात जास्त आकर्षित होतात. डास त्याकडे आकर्षित होत असले तरी किडे युकेलिप्टोल नावाच्या अन्य एका रसायनाला घाबरतात जे वनस्पतींमध्ये आढळते. संशोधक डॉ. एडगर सिमुलुंडू यांनी सांगितले की या संशोधनामुळे मलेरियावर मात करण्याच्या प्रयत्नांमध्ये यश मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *