हरवलेला स्मार्टफोन शोधण्यासाठी पोर्टल ; काही महिन्यांतच संपूर्ण देशात ही सेवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ मे । चोरीस गेलेला अथवा हरवलेला स्मार्टफोन शोधण्यासाठी केंद्र सरकारने १८ मेपासून सीईआयआर पोर्टल कार्यान्वित केले आहे. विशेष म्हणजे अवघ्या आठवडाभराच्या कालावधीतच या माध्यमातून तब्बल पाच लाख १२ हजार ५८३ तक्रारी नाेंदवल्या गेल्या असून त्यातील दोन लाख ५० हजार ०७९ मोबाइल ट्रेस झाले आहेत.

एखाद्याने माेबाइल हरवल्याची तक्रार दिल्यानंतर तो परत मिळण्यासाठी यापूर्वी मोठी कसरत करावी लागायची. मात्र, केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून नुकतीच महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर ‘मोबाइल ट्रेसिंग सिस्टिम’ तयार करण्यात आली असून मोबाइल हरवला, चोरीला गेला तर आता त्याची नाेंद संबंधित पाेर्टलवर करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यासाठी आपला मोबाइल हरवला असल्यास अगर चोरीला गेला असल्यास प्रथम संबंधित पाेलिस ठाण्यात त्याबाबत तक्रार अर्ज करावा लागेल. त्या अर्जाची प्रत साेबत जाेडल्यानंतर या पाेर्टलवर संबंधित माेबाइल क्रमांक ब्लॉक करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ‘टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बॉडी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक’द्वारे (TDBSFDAT) काही दूरसंचार मंडळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सिस्टिम सध्या बसवण्यात आली आहे. अल्पावधीतच त्याला माेठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट हाेते.

सीईआयआर पाेर्टलवर अशी करता येईल तक्रार
‘सीईआयआर’ पोर्टलवर लॉगीन केल्यानंतर पहिल्यांदा एफआयआरची कॉपी अपलोड करून मोबाइलचा तपशील व क्रमांक नोंदवावा. त्यानंतर मोबाइलचे ट्रॅकिंग सुरू होईल. आवश्यक्ता वाटल्यास तातडीने मोबाइल ब्लॉक ऑप्शनवर जाऊन तो ब्लॉकही करण्याची सुविधा त्यावर उपलब्ध आहे. कालांतराने माेबाइल सापडल्यावर ताे अनब्लाॅकही याच पद्धतीने करता येईल.

महाराष्ट्रासह इतर राज्यांत सध्या प्रायोगिक तत्त्वावर
सध्या महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक आणि ईशान्य क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या तक्रारी नाेंदवल्या जात आहेत, त्याचे परीक्षण करण्यात येत असून त्याला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता काही महिन्यांतच संपूर्ण देशभरात ही सेवा लागू करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *