Daam Virus : थेट कॉल लॉग आणि कॅमेरा हॅक करतोय हा व्हायरस ; केंद्रीय यंत्रणांनी दिला धोक्याचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ मे । तुम्ही जर अँड्रॉईड फोन वापरत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दाम नावाचा एक व्हायरस फोनमध्ये शिरून थेट कॉल लॉग, कॉन्टॅक्ट्स आणि चक्क कॅमेराही हॅक करत असल्याचं समोर आलं आहे. नॅशनल सायबर सिक्युरिटी एजन्सीने याबाबतचा इशारा दिला आहे.

इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) या व्हायरसबद्दल अधिक माहिती दिली. ही फिशिंग, हॅकिंग आणि अन्य ऑनलाईन हल्ल्यांपासून सायबर क्षेत्राची सुरक्षा करणारी केंद्रीय शाखा आहे.

किती आहे धोका?

हा व्हायरस (Daam Virus) मोबाईलमध्ये शिरल्यानंतर अँटी-व्हायरस प्रोग्राम्स आणि रॅन्समवेअर यांच्यातून सहज पुढे जातो. मोबाईलमधील सिक्युरिटी चेक देखील हा सहज पास करतो. यानंतर मोबाईलमधील कॉल लॉग, सर्च हिस्टरी, बुकमार्क अशी माहिती हॅक (Virus hacking call log) करतो.

एवढंच नाही, तर स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्ट्स आणि कॅमेरा देखील हा व्हायरस हॅक (Mobile Virus Hacking Camera) करू शकतो. यासोबत मोबाईलमधील पासवर्ड बदलणे, स्क्रीनशॉट घेणे, एसएमएस रीड करणे, फाईल्स अपलोड आणि डाऊनलोड करून C2 सर्व्हरला पाठवणे अशा कित्येक धोकादायक गोष्टी हा व्हायरस करू शकतो.

मोबाईलमधील डेटा आणि फाईल्स कोड करण्यासाठी हा मालवेअर अ‍ॅडव्हान्स इन्क्रिप्शन सिस्टीमचा वापर करतो. या इनक्रिप्टेड फाईल्सना ‘.enc’ हे एक्स्टेंशन दिसते. या फाईल्स व्यतिरिक्त इतर सर्व डेटा हा व्हायरस डिलीट करून टाकतो. यासोबतच ‘readme_now.txt’ नावाची एक नोट हा मालवेअर तुमच्या फोनमध्ये ठेवतो.


अशी घ्या खबरदारी
केंद्रीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस थर्ड पार्टी अ‍ॅप्स आणि अनट्रस्टेड वेबसाईट्सच्या माध्यमातून फोनमध्ये येतो. त्यामुळे, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करताना खबरदारी घेण्याचे निर्देश यंत्रणेने दिले आहेत. यासोबतच आणखीही टिप्स देण्यात आल्या आहेत.

अनोळखी नंबरपासून सावध
अनोळखी नंबरवरून आलेल्या टेक्स्ट मेसेजमधील कोणतीही लिंक क्लिक करू नका. बऱ्याच वेळा हॅकर्स ईमेल-टू-टेक्स्ट अशी सुविधा वापरून मेसेज करतात, त्यामुळे त्यांचे खरे मोबाईल नंबर ओळखू येत नाहीत.

कित्येक वेळा हॅकर्स बँकेचे नाव मेसेजमध्ये वापरतात. मात्र, बँकेकडून खरोखर मेसेज आला असेल, तर त्या नंबरमध्ये बँकेचे शॉर्ट नेमही दिसते. त्यामुळे अन्य नंबरवरून जर बँकेचा मेसेज आला, तर त्याकडे दुर्लक्ष करावे.

शॉर्ट यूआरएल
bitly किंवा tinyurl अशा माध्यमातून शॉर्ट करण्यात आलेल्या यूआरएल क्लिक करताना खबरदारी घ्या. अशा वेळी लाँग प्रेस करून किंवा कर्सर अशा लिंकवर नेऊन ती यूआरएल तुम्ही संपूर्ण पाहू शकता. त्यानंतरच ती उघडायची की नाही याचा निर्णय घ्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *