IPLमध्ये धोनीची आज शेवटची मॅच? चाहत्यांच्या मनात धाकधूक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ मे । आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजेतेपदासाठी सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्स सलग दुसऱ्या विजेतेपदासाठी तर चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरतील. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात की धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई जिंकणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. पण महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना तो पुढच्या हंगामात खेळणार की नाही? हे त्याचं शेवटचं आयपीएल आहे का? तो आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करणार का असे अनेक प्रश्न आहेत.

आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 14 हंगामात तब्बल 10 वेळा फायनलमध्ये धडक मारली आहे. यामध्ये चेन्नईने 4 वेळा विजेतेपद तर पाच वेळा उपविजेतेपद पटकावलंय. यंदाचा आयपीएल हंगाम सुरू होण्याआधीपासूनच धोनीचं हे अखेरचं आयपीएल असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर धोनीकडून मलाही माहिती नाही असं उत्तर दिलं गेलं.

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत धोनीवरच कर्णधार म्हणून विश्वास दाखवला आहे. चेन्नईकडून सर्वाधिक सामने खेळलेला धोनी आयपीएलमध्येही सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. आज फायनलमध्ये तो 250 वा सामना खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा आयपीएलमधला तो एकमेव खेळाडू आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने तीन वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली आहे. मात्र आयपीएलमध्ये त्याला खेळताना पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. धोनीचे वय सध्या 41 वर्षे इतके आहे. पण तरीही त्याचा फिटनेस तरुण खेळाडूंना लाजवणारा आहे. मात्र, तो पुढच्या हंगामात खेळेल की नाही यावर तोसुद्धा काही सांगू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *