जूनच्या पहिल्या आठवड्यात अभियांत्रिकी प्रवेश सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० मे । लाखो विद्यार्थ्यांची प्रतिक्षा असलेल्या अभियांत्रिकी प्रवेशाची नोंदणी ५ जूनपासून सुरु होण्याची शक्यता आहे. प्रथम नोंदणीला प्रारंभ होणार असून एमएचटी सीईटीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे. यंदाही अभियांत्रिकी प्रवेशाच्या तीन फेरी होणार आहेत.

अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात त्या गुणांच्या आधारे या तंत्र शिक्षण विभागातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तसेच कृषी अभ्यासक्रमासह तब्बल तीन लाख जागावर प्रवेश दिले जातात. या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनपर्यंत जाहीर होईल अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे. त्या अगोदर प्रत्यक्ष प्रवेश नोंदणीला प्रारंभ केला जाणार आहे.

‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेसाठी यावर्षी ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी पीसीएम मधून ३ लाख ३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर २ लाख ७७ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर २५ हजार ६४५ विद्यार्थी गैरहजर होते. तर पीसीबी मधून ३ लाख ३३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख १३ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर १९ हजार ३०९ विद्यार्थी गैरहजर होते. हे विद्यार्थी आता निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. यावर्षी ‘एमएचटी-सीईटी’ नोंदणीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत नोंदणीत मोठी वाढ झाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांना पुन्हा पूर्वीचे दिवस येतील असे संस्थाचालकांना आशा आहे.

गतवर्षी ऑक्टोबरमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. विद्यार्थ्यांचे वर्ग १ नोव्हेंबरपासून सुरू झाले. प्रवेश प्रक्रिया उशिरा होवूनही प्रवेशात वाढ झाली होती. अभियांत्रिकीच्या १ लाख ४५ हजार २०१ जागा होत्या. त्यापैकी १ लाख ९ हजार ४९९ जागांवर प्रवेश झाले. सुमारे ३६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. गतवर्षी राज्यात असलेल्या १ लाख ४५ हजार २०१ जागापैकी १ लाख ०९ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. मुंबई विभागात अभियांत्रिकी प्रवेशाचा वरचष्मा राहिला होता. मुंबई शहर, उपनगर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी एकूण २८ हजार ६६८ जागा उपलब्ध होत्या. यापैकी एकूण २० हजार ६२९ जागांवर प्रवेश घेतले आहेत तर ८ हजार ३९ जागा रिक्त राहिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ‘कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केले तरच आयटी क्षेत्रात नोकरी हमखास असे चित्र यंदा प्रवेशात दिसून आले होते. नेहमीच्या मेकॅनिकल, सिव्हिल यासारख्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची पसंती कमी दिसली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *