Monsoon Update ; राज्यात ४ जूननंतरच पाऊस, तोपर्यंत उष्णतेची लाट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जून । हिमालयापासून मध्यप्रदेशपर्यंत व दक्षिण भारतात धो-धो पाऊस बरसत असताना महाराष्ट्रात मात्र प्रखर उष्णतेची लाट आहे. ही लाट ४ जूनपर्यत राहणार असून त्यापुढे अवकाळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Monsoon Update, Heatwave in Maharashtra)

मान्सून तब्बल ११ दिवसांनंतर अंदमानातून पुढे सरकला. यंदा त्याचा मुक्काम दरवर्षीपेक्षा तेथे जास्त काळ झाला. आता तो मालदिव बेटांत प्रगती करीत असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अफगाणिस्तानात १ जूनपासून नवा पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील पाऊस वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवातामुळे हिमालयापासून मध्यप्रदेशपर्यंतच्या भागात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार सुरू आहे. तसेच केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश किनारपट्टी भागातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडत असला तरीही उष्णतेची लाट कायम आहे.

१ ते ३ जूनपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधित कमाल तापमान ४० ते ४२ अंशांवर राहील. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला, तर कोकणला वेदर डिस्कंफर्टचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात वेगाने बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्यात ४ जूननंतर जोरदार अवकाळी पाऊस बरसेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मान्सूनची दुसरी शाखा कार्यरत होण्याची शक्यता..
मान्सून अंदामानातून मालदिव बेटांपर्यंत आला आहे. तो दोन मार्गांनी भारतात येतो. पहिला मार्ग केरळ व दुसरा पश्चिम बंगाल, बिहारमार्गे उत्तर भारतात प्रवेश करतो. शास्त्रज्ञांच्या मते त्याची दुसरी शाखा सक्रिय होऊन तो ४ जूननंतर वेग घेऊ शकतो, असाही अंदाज आहे. मात्र, त्याला हवामान विभागाने दुजोरा दिलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *