…… हा व्हायरस, फोनमध्ये आला की विषयच संपला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ जून । स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअरचे जसे वेळोवेळी अपडेट येत असतात, तसंच स्पॅमर्स देखील आपले व्हायरस अपडेट करत असतात. त्यामुळेच फोन हॅक करणारे मालवेअर (Smartphone Virus) वारंवार समोर येत असतात. आताही स्पिन ओके नावाच्या एका व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे गुगलच्या प्लेस्टोअरवरील सुमारे १०० हून अधिक अ‍ॅप्समध्ये हा व्हायरस आढळला आहे.

सिक्युरिटी रिसर्च करणाऱ्या डॉ. वेब या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. प्लेस्टोअरवरील अ‍ॅप्स (Google PlayStore) आपण सुरक्षित असल्याचं समजून डाऊनलोड करतो. मात्र, अशा अ‍ॅप्समधूनच हा व्हायरस येत असल्यामुळे जगभरात सुमारे ४० कोटीहून अधिक वेळा याला डाऊनलोड केलं गेलं आहे.


किती आहे धोका?
हा व्हायरस (SpinOK Virus) तुमच्या स्मार्टफोनमधील डेटा चोरी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. एखादी जाहिरात किंवा मिनि गेमच्या स्वरूपात हा व्हायरस दिसतो. यावर क्लिक केल्यानंतर हा मालवेअर तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतो. यानंतर तुमची खासगी माहिती हा व्हायरस विदेशात पाठवतो. काही प्रकरणांमध्ये संपूर्ण फोनच रिमोट मोडवर गेल्याचं दिसून आलं आहे. यामुळे विदेशात बसलेले हॅकर्स तुमचा फोन वापरू शकतात.

कोणत्या अ‍ॅप्समध्ये आढळला?
प्लेस्टोअरवरील सुमारे १०० हून अधिक अ‍ॅप्समध्ये हा व्हायरस आढळला आहे. यामध्ये काही लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. झाप्या (Zapya) हे फाईल ट्रान्सफर करणारे अ‍ॅप, नॉईज (Noizz) हे व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅप, कॅशझीन (Cashzine) हे मनी रिवॉर्ड अ‍ॅप, फिझो नॉव्हेल (Fizzo Novel) हे ऑफलाईन रीडिंग अ‍ॅप, ब्युगो (Biugo) हे व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅप, यासोबतच कॅशईएम (CashEM), एमव्हीबिट (MVBit), व्हीफ्लाय (VFly) अशा इतर अ‍ॅप्समध्येही हा मालवेअर (SpinOK Malware) आढळला आहे.

अशी घ्या खबरदारी
मालवेअर आढळल्यानंतर या अ‍ॅप्सना गुगल प्लेवरून हटवण्यात आलं आहे. मात्र तुम्ही यापूर्वीच यांपैकी एखादे अ‍ॅप इन्स्टॉल केले असेल, तर तातडीने ते अनइन्स्टॉल करण्याची गरज आहे. तसंच, यानंतर शक्य तितक्या लवकर स्मार्टफोन अपडेट करणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त तुम्ही एखाद्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरची मदतही घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *