“उद्धव साहेबांची खुर्ची गेली तेव्हा तुम्हाला काय वाटलं?” राज ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुन । छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ठरलेला अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत आहे. आजपासून या कार्यक्रमाचं तिसरं पर्व सुरू होत आहे. या कार्यक्रमाबद्दल सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. तर या पर्वाच्या पहिल्या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली. या कार्यक्रमात येऊन राज ठाकरे यांनी विविध गोष्टींवर मनमोकळा संवाद साधला.

राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात संवाद साधताना स्वतःला आणि इतरांना खुपणाऱ्या गोष्टींवरही भाष्य केलं. गेल्यावर्षी शिवसेनेतून ४० आमदार बाहेर पडून त्यांनी याच पक्षाचा दुसरा गट तयार केला. ही घटना म्हणजे उद्धव ठाकरेंना बसलेला मोठा धक्का होता. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. “उद्धव साहेबांची खुर्ची गेली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं?” असं अवधूत गुप्तेने राज ठाकरे यांना या कार्यक्रमात विचारलं. या प्रश्नाचं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, “भाऊ म्हणून मला वाईट वाटलं आणि हा झाला एक भाग. पण मुख्यमंत्री म्हणून तुमचं लक्ष असायला हवं होतं. तुमचा सरळपणा, भाबडेपणा असेल किंवा तुमचं दुर्लक्ष असेल, पण या गोष्टीमुळे ४० जण तुमच्या हाताखालून निघून जातात हे काही सतर्क असलेल्या माणसाचं लक्षण नव्हे.” तर त्यावर “तुम्ही आता ज्या हक्काने हे ठोकून सांगताय तसं सांगणारा एक भाऊ आता त्यांच्या बाजूला नाही,” असं अवधूत म्हणाला. त्यावर उत्तर देत राज ठाकरे म्हणाले, “आता पवार साहेब बाजूला असताना मी कशाला पाहिजे… इतकी हक्काची माणसं त्यांच्या बाजूला आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *