अमित शहांची मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी ; ही नावे चर्चेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी नऊ महिन्यांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारास परवानगी दिल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. भाजप व शिंदेसेनेतील प्रत्येकी १० आमदारांना मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापर्यंत शपथविधी होईल. त्यात दोन्ही गटातील प्रत्येकी एक किंवा दोन महिलांनाही स्थान दिले जाऊ शकते. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर १९ जूनला येणारा पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. तो दणक्यात साजरा करण्याचे शिंदेंचे नियोजन आहे. तत्पूर्वी पक्षाचे आणखी १० मंत्री वाढावेत, असे त्यांचे प्रयत्न आहेत.

ही नावे चर्चेत : दोन्ही गटात इच्छुकांची यादी माेठी
भाजप : विदर्भ : संजय कुटे मुंबई : योगेश सागर, किसन कथोरे, मनीषा चौधरी. रणधीर सावरकर, गणेश नाईक पश्चिम महाराष्ट्र : माधुरी मिसाळ मराठवाडा : मेघना बोर्डीकर उत्तर महाराष्ट्र : जयकुमार रावल, देवयानी फरांदे.

शिवसेना : कोकण : याेगेश कदम, भरत गोगावले विदर्भ : बच्चू कडू , संजय रायमूलकर, संजय गायकवाड मराठवाडा : संजय शिरसाट प. महाराष्ट्र : अनिल बाबर, प्रकाश आबिटकर मुंबई : यामिनी जाधव उ. महाराष्ट्र : चिमणराव पाटील, सुहास कांदे

मिशन लोकसभा | मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने ‘लोकसभा मिशन ४५’ डोळ्यासमोर ठेवले आहे. ते पूर्णत्वास नेण्यासाठी जे नेते फायदेशीर ठरू शकतात त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते. विशेषत: प्रथम निवडून आलेल्या व मतदारसंघात प्रभावी असलेल्या चेहऱ्यांना पसंती देण्यात यावी, असे दिल्लीतून निर्देश आहेत.

वाचाळवीरांना डच्चू | ‘वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू देण्याचे निर्देश अमित शाहांनी दिल्याची माहिती खरी आहे का?’ असे पत्रकारांनी विचारले. त्यावर आमदार भरत गोगावले म्हणाले, ‘त्यांनी जे सांगितलेय ते चुकीचे नाही. तशी काही स्ट्रॅटेजी असू शकते. पण वाचाळवीर कोण हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ठरवतील.’

केंद्रात दोघांना संधी : एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे १३ खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातही लवकरच फेरबदल होणार आहेत. त्यापैकी दोन नेत्यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकते. यात बुलडाण्याचे प्रतापराव जाधव, मुंबईतील गजानन कीर्तिकर व राहुल शेवाळे या खासदारांची नावे चर्चेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *