राज्यात दंगली घडवल्या जाताहेत, सरकारचेच अशा गोष्टींना प्रोत्साहन; शरद पवारांचा गंभीर आरोप

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुन । राज्यात वारंवार धार्मिक-जातीय तणावाच्या घटना घडत आहेत. कालच एक घटना संगमनेर येथे घडली तर दुसरी घटना कोल्हापूरला. या घटना जाणुनबुजून घडवल्या जात आहेत. राज्य सरकारच अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.शरद पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान, संगमनेर येथे दोन गटात झालेली दगडफेक तर कोल्हापुरात औरंगजेबाच्या फोटोवरून निर्माण झालेला तणाव या दोन्ही घटनांवर शरद पवारांनी परखड भाष्य केले.

घटना एका जिल्ह्यात, आंदोलन दुसऱ्या जिल्ह्यात
शरद पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर औरंगाबादमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायची काय गरज? पुण्यात कोणाला याविषयी पडले आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून आणखी तणाव निर्माण कसा होईल, हे पाहिले जात आहे.

राज्य सरकारकडूनच घटनांना धार्मिक स्वरूप
शरद पवार म्हणाले, काल राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोणीतरी मोबाईलवर मॅसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहीत करणे योग्य नाही. दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करून राजकारण करणे चांगली गोष्ट नाही.

ओरिसासह काही राज्यांत चर्चवर हल्ले
शरद पवार म्हणाले, ओरीसा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस अ‌ॅक्शन घ्यावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहे. हे एकट्या दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *