नारायण राणेंची सभा उधळणाऱ्यांवर १८ वर्षांनी आरोप निश्चित; ‘ते’ खासदार, आमदार कोण?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुन । कधीकाळी सख्खे मित्र असलेले आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर कट्टर वैरी झालेले खासदार-आमदार मंगळवारी न्यायालयात एकत्र दिसले. २००५ मध्ये नारायण राणे यांची शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या कार्यालयाजवळ झालेली सभा उधळून टाकल्याप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यासाठी हे सर्व जण न्यायालयात उपस्थित होते. यावेळी तीन खासदार, चार आमदार यांच्यासह ३८ आरोपींवर तब्बल १८ वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आले.

विशेष न्यायालयाने मंगळवारी शिवसेनेच्या दोन गटांतील खासदार, आमदार आणि मनसेच्या नेत्यांसह ३८ जणांवर आरोप निश्चित केले. ही घटना २४ जुलै २००५ ची आहे. नारायण राणे शिवसेनेतून वेगळे होत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या कार्यालयाबाहेरच सभा आयोजित केली होती. या सभेला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे नेते व शिवसैनिक जमा झाले होते. पोलिसांना यावेळी लाठीचार्ज करावा लागला होता.

– या घटनेप्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. एकूण ४७ आरोपी होते. पाच आरोपींचा मृत्यू झाला. तर चार आरोपी गैरहजर होते.

– संजय बावके, रवींद्र चव्हाण आणि हरिश्चंद्र सोलकर या तिघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. तर श्रीधर सावंत रुग्णालयात असल्याने त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली.

आरोप निश्चित झालेले खासदार, आमदार कोण?

– खा. अनिल देसाई, खा. अरविंद सावंत आणि खा. विनायक राऊत (ठाकरे गट)
– आ. अनिल परब, आ. अजय चौधरी, आ. रवींद्र वायकर (ठाकरे गट)
– आ. सदा सरवणकर (शिंदे गट)

अन्य आरोपी कोण?

माजी आमदार दगडू सकपाळ (ठाकरे गट), किरण पावसकर (शिंदे गट), बाळा नांदगावकर (मनसे नेते), माजी महापौर विशाखा राऊत (ठाकरे गट), यशवंत जाधव (शिंदे गट), राजू पेडणेकर, जितेंद्र जानवले.

आरोपींनी आरोप फेटाळले

मंगळवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आरोपांचे वाचन केले आणि सर्व आरोपींनी आरोप फेटाळले. न्यायालयाने आयपीसी १४१, १४३, १४५, १४७, १४९, ३१९, ३५३ यासह महाराष्ट्र पोलिस अधिनियम १३५ नुसार आरोप निश्चित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *