महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुन । राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची सुरवात सोमवारपासून (१२ जून) होणार आहे. २० जुलैला प्रवेशाची पहिली यादी जाहीर होऊन प्रवेश घ्यायला सुरवात होईल. विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.
आयटीआय प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक पात्रता असलेल्या १४ वर्षांवरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी पात्र असणार आहे. या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीच्या ‘आयटीआय’ची निवड करणे, अर्जात दुरुस्ती व हरकती नोंदविण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ९५ हजार ३८० आणि ५७४ खासगी ‘आयटीआय’मध्ये ५९ हजार १२ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश (मुलींसाठी एकूण ५३ हजार ६०० जागा राखीव) मिळणार आहे. १२ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार असून १ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाचे टप्पे पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
दहावीनंतर पुढे शिकून तर कोठे सरकारी नोकरी लागणार आहे, असा भविष्याचा विचार करून अनेकजण ‘आयटीआय’कडे वळत असल्याची वस्तुस्थिती आहे. आता अकरावीसह तंत्रनिकेतनचे (अभियांत्रिकी डिप्लोमा) देखील प्रवेश सुरु आहेत. त्यामुळे कोणत्या प्रवेशाला विद्यार्थ्यांची पसंती सर्वाधिक राहिली, विद्यार्थ्यांचा कल काय आहे हे ऑगस्टमध्ये स्पष्ट होणार आहे.
‘आयटीआय’ प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्जाची सुरवात : १२ जून ते ११ जुलै
पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम : १९ जून ते १२ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : १६ जुलै
पहिली प्रवेश फेरी : २० जुलै
द्वितीय प्रवेश फेरी : ३१ जुलै
दुसऱ्या यादीनुसार प्रवेश : १ ते ४ ऑगस्ट
तिसरी प्रवेश फेरी : ९ ऑगस्ट
चौथी प्रवेश फेरी : २० ऑगस्ट
फिटर, इलेक्ट्रिशनला सर्वाधिक पसंती
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून एक-दोन वर्षाचा ट्रेड (कोर्स) पूर्ण करून दहावीनंतर लगेचच खासगी नोकरीत पदार्पण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी साधारणतः: एक लाख तरुण-तरुणी ‘आयटीआय’ला प्रवेश घेतात. ‘आयटीआय’च्या माध्यमातून एकूण ८२ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामध्ये फिटर व इलेक्ट्रिशन या दोन कोर्सला सर्वाधिक मागणी असून दरवर्षी त्या ट्रेडचे १०० टक्के प्रवेश हाऊसफुल होतात.