महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुन । एकीकडे पावसाची (Monsoon Update) प्रतिक्षा लागली असताना दुसरीकडे आता चक्रीवादळाचा (Cyclone) धोका निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळे मान्सूनही लांबला आहे. बिपरजॉय (Biporjoy) चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. आयएमडीने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राचं आता चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं आहे. या चक्रीवादळाला बिपरजॉय नाव देण्यात आलं असून हे वेगाने उत्तरेकडे सरकताना दिसत आहे. देशालाही या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाची शक्यता
चक्रीवादळ हळूहळू तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण किनारपट्टी भागात पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे, पालघर या भागात 24 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील खोल दाब क्षेत्र 4 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकलं असून ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ तीव्र झालं आहे. बिपरजॉय चक्रीवादळ बुधवारी गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 920 किमीवर तर मुंबईच्या 1050 किमी नैऋत्य, पोरबंदरपासून 1130 किमी दक्षिण-नैऋत्येस होते.
मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा इशारा
पूर्वमध्य अरबी समुद्रावरील बिपरजॉय चक्रीवादळ गेल्या 6 तासांमध्ये 6 किमी प्रतितास वेगाने जवळजवळ उत्तरेकडे सरकलं आहे. चक्रीवादळामुळे केरळ-कर्नाटक किनारपट्टी आणि लक्षद्वीप-मालदीव आणि कोकण, गोवा किनारपट्टीवर 8 ते 10 जूनपर्यंत समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्रात उतरलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर गेला आहे. हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची संभाव्य तारीख दिलेली नाही.