Ind vs Aus WTC 2023 Final: भारतीय फलंदाजांकडूनही निराशा ! टीम इंडिया ५ बाद १५१

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुन । Ind vs Aus WTC 2023 Final : पहिल्या दिवशी गोलंदाजांचे अपयश तर दुसऱ्या दिवशी फलंदाजांकडून निराशा. जागतिक कसोटी अंतिम सामन्यात भारतीय संघाची रडकथा कायम राहिली. ऑस्ट्रेलियाच्या ४६९ धावांचा सामना करताना भारताची ५ बाद १५१ अशी अवस्था झाली.

भारतीय संघ अजून ३१८ धावांनी पिछाडीवर आहे तर अजिंक्य रहाणे आणि केएस भरत ही प्रमुख फलंदाजीतील अखेरची जोडी मैदानात आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी ११९ धावा हव्या आहेत.

भारतीय डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिलने आत्मविश्वासाने केली. ३० धावा चांगल्या वेगाने जमा झाल्या असताना पहिला धक्का लागला. पॅट कमिन्सने रोहित शर्माला पायचित केले. गिलला स्कॉट बोलंडच्या चेंडूचा अंदाजच आला नाही. थोडासा टप्पा पडून आत येणारा चेंडू सोडून देण्याचा अंदाज शुभमनचा चुकला आणि त्याची उजवी यष्टी वाकली.

चहापानानंतर खेळ सुरू झाल्यावर भरवशाचा चेतेश्वर पुजाराही आपल्या यष्टी वाचवू शकला नाही. या धक्यातून सावरण्याच्या अगोदरच विराट कोहलीही माघारी फिरला स्टार्कच्या अचानक उडालेल्या चेंडूवर विराटचा झेल स्लिपमध्ये स्मिथने आरामात पकडला.

प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणारा अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांनी ७१ धावांची भागीदारी करून डाव सावरला, परंतु फिरकी गोलंदाज लायनकडून बाद झाला. एकीकडे ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज वर्चस्व राखत असताना लायननेही आपली करामत दाखवली. अजिंक्य रहाणे २९ धावांवर नाबाद राहिला असला तरी त्यालाही तिखट माऱ्याचा सामना करावा लागला.

आज ३ बाद ३२७ अशा भरभक्कम अवस्थेत ऑस्ट्रेलियन संघाने आपला डाव चालू केला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवशी केलेल्या चुका थोड्या सुधारल्या. मारा करताना टप्पा दिशा योग्य ठेवल्याचा फायदा झाला आणि १४२ धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचे उरलेले सात फलंदाज बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले.

एक फलंदाज दीड शतकाच्या जवळ, तर दुसरा शतकाच्या उंबरठ्यावर अशा परिस्थितीत दुसऱ्‍या दिवशीचा खेळ चालू झाला. स्टीव्ह स्मिथने ३१ वे कसोटी शतक झळकावले. दुसऱ्‍या बाजूने १६३ धावांची योग्य परिणाम साधणारी खेळी खेळून ट्रॅव्हीस हेड अखेर सिराजला बाद झाला. स्मिथ- हेडदरम्यान तब्बल २८५ धावांची भागीदारी झाली. शार्दूल ठाकूरने स्मिथला १२१ धावांवर बाद केले. अलेक्स केरीने ४८ धावांची खेळी करून भारतीय संघाचे मनसुबे पूर्ण होऊन दिले नाहीत.

संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः ४६९ (डेव्हिड वॉर्नर ४३, स्टीव स्मिथ १२१, ट्रॅव्हिस हेड १६३, अलेक्स कॅरी ४८, शमी २९-४-१२२-४, सिराज २८.३-४-१०८-४, शार्दुल २३-४-८३-२, जडेजा १८-२-५६-१) भारत, पहिला डाव ः ५ बाद १५१ (रोहित शर्मा १५, शुभमन गिल १३, चेतेश्वर पुजारा १४, विराट कोहली १४, अजिंक्य रहाणे खेळत आहे २९, रवींद्र जडेजा ४८, स्टार्क ५२-१, कमिंस ३६-१, बोलँड २९-१, ग्रीन २२-१)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *