Ashadhi Wari 2023: तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालख्यांचे सोमवारी पुण्यात आगमन ; पुणे पोलिसही दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी सज्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुन । Ashadhi Wari Sohala 2023: आषाढी वारी सोहळ्याला आजपासून सुरूवात होत असून विठूरायाच्या भेटीला निघण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. आज जगतगुरू तुकोबांची पालखी देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. तर आळंदी येथून जेष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच ११ जून २०२३ रोजी ज्ञानोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे.

या दोन्ही पालख्यांचे सोमवारी पुण्यात आगमन होणार आहे. पुणेकरांसोबतच पुणे पोलिसही दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

दोन्ही पालख्यांचे सोमवारी पुण्यात आगमन….
याबाबत अधिक माहिती अशी की, जगद॒गुरू तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj) यांच्या पालख्यांचे पुणे शहरात सोमवारी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सुमारे सात हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पुणे (Pune) शहरात दोन्ही पालख्या सोमवारी आणि मंगळवारी मुक्कामी राहणार असून, बुधवारी पालखी सोहळा पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल. (Ashadhi Wari Sohala)

पुण्यात कडेकोट बंदोबस्त…
या पालखी सोहळ्याच्यावर पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच पालखी सोहळ्यातील वारकरी, भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यात येत आहे. गर्दीमध्ये सोनसाखळी, मोबाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेकडून साध्या वेशातील पोलिस पथके गस्त घालणार आहेत.

शहरात पालखी सोहळ्यादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास मनाई असल्याचेही आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच २९ जून २०२३ रोजी दोन्ही पालख्या पंढरी नगरीत पोहोचतील. ३ जुलैपर्यंत पालखी पंढरपूरातच मुक्कामी असेल आणि विठ्ठल- रुक्मिणीभेटीनंतर त्याच दिवशी पालखीचा परतीचा प्रवास वाखरी येथून सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *