महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुन । अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, अत्यंत तीव्र रुप धारण केलेले हे वादळ आता आपली दिशा बदलण्याच्या तयारीत आहे. कारण हे वादळ आता गुजरातच्या दिशेने सरकणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर गुजरातच्या किनारपट्टीकडे थोडेसे पूर्वेकडे हे वादळ सरकण्याचा अंदाज आहे. तसंच १५ जून रोजी येथे भूकंपाचा धोकाही संभवतो. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
“दिशा बदलल्याने गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर २-३ मीटरचे वादळ निर्माण होऊ शकते. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घरांचे आणि रस्त्यांचे नुकसान, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच, शेती फळबागांच्या नुकसानीचीही भीती आहे. रेल्वे, पॉवरलाईन, सिग्नलिंग यंत्रणाही बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे”, असं प्रादेशिक विशेष हवामान केंद्राच्या (RSMC) बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.
मुंबईपासून ५४० किमी अंतरावर
बिपरजॉय चक्रीवादळाचे काल (११ जून) अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले. हे वादळ काल मुंबई किनारपट्टीपासून ५४० किमी अंतरावर होते. यामुळे मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तर, मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात रात्री जोरदार वारा सुटला होता. यामुळे धुळीचं साम्राज्य निर्माण झालं होतं.
#WATCH | Navsari, Gujarat: Effect of cyclone 'Biparjoy' seen as strong winds & high tides hit Gujarat coast. pic.twitter.com/4QOIh5kZMz
— ANI (@ANI) June 12, 2023
१४ जूनपर्यंत हे वादळ उत्तर दिशेला सरकरण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे वादळ इशान्येकडे सरकेल. तिथून ते १५ जूनपर्यंत सौराष्ट्र आणि कच्छची सीमा पार करून गुजरातचा मांडवी आणि पाकिस्तानातील कराची या पाकिस्तानी किनाऱ्यांना धडकेल, असंही या बुलेटीनमध्ये नमूद आहे.
हे वादळ गुजरातची सीमा टाळून पाकिस्तानकडे रवाना होईल, असा अंदाज शनिवारी लावण्यात आला होता. हे वादळ पुढच्या २४ तासांत उत्तर ईशान्य दिशेला सरकेल असे RSMC च्या शनिवारच्या बुलेटिनमध्ये सांगण्यात आले होते. परंतु, सध्याच्या बुलेटिनमध्ये हे वादळ गुजरातची सीमा टाळेल असा कोणताही अंदाज वर्तवण्यात आला नाही.
अरबी समुद्रातील वादळ गुजरात किनाऱ्यावर
अरबी समुद्रात निर्माण होणारे चक्रीवादळ भारतीय किनाऱ्यांना धडकत नाही. ७५ टक्के चक्रीवादळे उत्तरेच्या भागात वळतात. कधी कधी ही वादळं पाकिस्तान, इराण किंवा ओमनच्या दिशेने सरकतात. या वादळांचा वेग अतितीव्र असल्यासच ते भारताकडे सरकू शकतात. फक्त २५ टक्के प्रमाणात चक्रीवादळ ईशान्येकडे सरकते. त्यावेळीही याचा धोका गुजरातच्या किनारपट्ट्यांना अधिक असतो.