महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुन । छत्रपती संभाजीनगर ते पैठण या अनेक वर्षे रखडलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामात कंत्राटदाराने कुठलीही गडबड केल्यास त्याला रगडून टाकू. कडक कारवाई करून त्याच्याकडूनच रस्ता दुरुस्त करून घेतला जाईल, असा खणखणीत इशारा केंद्रीय रस्ते व वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिला.
पैठण दौऱ्यावर आले असता गडकरींनी पत्रकारांशी संवाद साधला. या महामार्गाची निविदा ४१ टक्के कमी दर भरणाऱ्या ठेकेदारास मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे हे काम दर्जेदार होण्याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. ‘दिव्य मराठी’ने गडकरी यांना हा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, ‘मी ५० लाख कोटींची कामे केली आहेत. सर्व कामे दर्जेदार व पारदर्शीपणे होतात. आमच्याकडे भ्रष्टाचार होत नाही. ठेकेदार आमच्या घरी येत नाहीत. पैठण रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवा. काही गडबड केल्यास ठेकेदारास रगडून टाकण्याचे काम मी करेन.’
पालखी मार्गाचे काम दिवाळीपर्यंत
पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण रस्त्याला ढोरकीन, बिडकीन आणि गेवराई इथे बायपास देण्याची मागणी केली. त्यावर तपासून निर्णय घेतला जाईल. तसेच पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण केले जाईल, असे गडकरी म्हणाले.