![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुन । यंदा उशिराने दाखल झालेला मान्सून अखेर आता पुढील ४८ तासांत राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. अशात हवामान खात्याकडून पुढच्या काही तासांसाठी महत्त्वाच्या शहरांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे पुढच्या ३ ते ४ तासांत पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, यावेळी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ३०-४० किमी प्रतितास वेग असलेल्या सोसाट्याच्या वारा असेल. यामुळे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील निर्जन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पुढील ३-४ तासांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनीही आपला शेतमाल योग्य त्या ठिकाणी ठेवावा. अशात, पश्चिम किनारपट्टीवरील अनुकूल स्थितीमुळे नैर्ऋत्य मान्सूनने रविवारी गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरीपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे मान्सून आता लवकरच संपूर्ण राज्यात हजेरी लावेल.
मान्सूनच्या प्रगतीत अडथळा बनलेले मध्य पूर्व अरबी समुद्रात सक्रिय असलेले बिपरजॉय चक्रीवादळ सध्या संथ गतीने उत्तरेकडे सरकत आहे. वादळ जसे जसे उत्तरेकडे सरकत आहे, तसे पश्चिम किनारपट्टीवर मोसमी वारे सक्रिय होत आहेत. शनिवारी कर्नाटकमधील कारवारपर्यंत पोचलेल्या मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा काही भाग व्यापला.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग व्यापत मान्सून पश्चिम बंगालच्या काही भागांत प्रवेश करू शकतो. मान्सूनची किनारपट्टीवर प्रगती दिसत असली, तरी राज्याच्या इतर भागांतील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी घाई करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.