Ashadhi Wari 2023 : माऊलींचा सोहळा सासवडनगरीत; कर्‍हाकाठी लाखो वैष्णवांचा मेळा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुन । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा लाखो वैष्णवांसह माउलीनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगांच्या गजरात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी संत सोपानकाकांच्या सासवडनगरीत (ता. पुरंदर) बुधवारी (दि. 14) रात्री 8.15 च्या सुमारास दाखल झाला. या वेळी पालखीरथावर सासवड नगरपालिकेच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात येऊन माउलींचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले.


सासवडनगरीत माउलींच्या स्वागतासाठी दुतर्फा गर्दी होती. रांगोळ्या, पुष्पवृष्टी, फटक्यांची आतषबाजी करत ‘माउली माउली’ जयघोषाने सोहळा रंगला. माउलींच्या पालखी सोहळ्याचा सासवडनगरीत (दि. 14) आणि (दि. 15) असा दोन दिवसांचा मुक्काम आहे.

सासवडनगरीत माउलींच्या पालखीचे आगमन झाल्यावर चंदनटेकडी येथे नगरपरिषदेच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप, संजय ग. जगताप, सुहास लांडगे, विजय वढणे, अजित जगताप, मनोहर जगताप तसेच नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, कार्यालय अधीक्षक संदेश मांगडे, अभियंता धोंडीराम भगनुरे, करनिरीक्षक उत्तम सुतार यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि विभागप्रमुखांनी सर्व दिंडींतील प्रमुख, वीणेकरी चोपदार व तुळशी वृंदावनधारक महिला यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन माउलींच्या पालखीरथाचे स्वागत केले.

सासवडमध्ये माउलींचे धाकटे बंधू संत सोपानदेवांची समाधी आहे. माउलींचा सोहळा सासवडनगरीत असतानाच सोपानदेवांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतो. सासवडनगरीत अनेक उपक्रम राबविले जातात. वारकर्‍यांचे पाय चेपून देणे, केशकर्तन, आरोग्यतपासणी असे अनेक सेवाभावी उपक्रम पालखी मुक्कामाच्या वेळी सासवडकर राबवत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *