महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुन । 2019 ला मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटली अन् शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली. पुढे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं अन् उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ठाकरे सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पण गेल्या वर्षी तेव्हा नगरविकासमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारत भाजपसोबत युती केली. पण या सगळ्या घडामोडीदरम्यान नक्की काय घडलं? आमदार सूरतला कसे गेले? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे कधी ठरलं? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडले. त्याची उत्तरं देणारी एक मुलाखत सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे.
अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आदेश बांदेकर यांनी अकोला-बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि धाराशिवचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुलाखत घेतली. यात नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी मोठे खुलासे केले आहेत.
सत्तांतर होण्याच्या एक महिनाआधी आम्हाला हे माहिती होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कदाचित हे माहिती नसावं. पण स्वत: एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं होतं की, मी मुख्यमंत्री होणार आहे, असं गौप्यस्फोट नितीन देशमुख केला आहे.
देवेंद्र फडणवीस काय सांगतात माध्यमांसमोर की मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. पण फडणवीसांना सत्तांतर होणार हे माहिती होतं. पण मुख्यमंत्री कोण होणार हे माहिती नव्हतं. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांना फक्त माहिती होतं की मुख्यमंत्री होणार ते, असा खुलासा आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सहा महिन्यातच सत्ता बदल करण्याच्या आणि बंडखोरीच्या तयारीला सुरूवात झाली, असं नितीन देशमुख म्हणालेत.