Ashadhi Wari 2023 : दुपारच्या विसाव्यासाठी तुकाराम महाराज पालखीचे नागेश्वर मंदिरात आगमन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुन । जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा वरवंड ते उंडवडी हा सर्वात मोठा टप्पा असल्याने हा पार करण्यासाठी सोहळ्याचे आगमन पाटस (ता. दौंड) गावात होताच पाटसकरांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. पालखी सोहळ्याला गोड जेवणाचा स्वाद दिला असल्याने वारकऱ्यांनी पाटसकरांचे कौतुक केले. दौंड तालुक्यातील यवत येथे पहिला व वरवंड येथे शुक्रवारचा (दि. १६) दुसऱ्या दिवशी मुक्कामी असणारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (दि. १७) पहाटे ६ वाजताची आरती घेऊन तालुकावासियांना निरोप देण्यासाठी बारामती तालुक्यात उंडवडी गवळ्याची या ठिकाणी पुढील मुक्कामासाठी निघाला. दरम्यान दुपारच्या विसाव्यासाठी तो पाटस येथे पोहचला.

पाटस गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजता या पालखी सोहळ्याचे आगमन झाले. मंदिरातून सकाळी ११ वाजता रोटी घाट पार करण्यासाठी हा पालखी सोहळा मंदिराबाहेर पडणार आहे.

वरवंड (ता. दौंड) येथील मुक्काम उरकून पालखी सोहळ्याने पाटस दिशेने प्रवास सुरू केला असताना वरवंड येथून चार किमी अंतरावर असणाऱ्या पाटस हद्दीतील भागवतवाडी येथे पालखी सोहळ्याचे सकाळी पावने आठ वाजता आगमन झाल्यावर वैष्णवांना चहा-नाष्टाची सोय करण्यात आली होती. या ठिकाणी १५ मिनिटांची विश्रांती करत दुपारचा विसावा घेण्यासाठी पाटस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी ९ वाजता या पालखी सोहळ्याचे आगमन होताच ग्रामस्थांनी स्वागत केले. ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीने प्रवेश केल्यावर भाविकांना दर्शन खुले केले. पुढील प्रवासासाठी अवघड ठरणारा रोटी घाट पार करण्यासाठी सर्व वैष्णवांना पाटस गावाकडून नेहमीप्रमाणे गोड जेवणाचा स्वाद देण्यात आला.

पालखी महामार्गाच्या कामात नव्याने तयार झालेले रोटी घाट आणि पालखी सोहळ्यात अद्यापही पावसाने हजेरी लावली नसल्याने घाटात नैसर्गिक सौंदर्य उपलब्ध नाही. त्यामुळे हा पालखी सोहळा दुसऱ्यांदा घाट कसा पार करेल व किती बैल जोड्यांची मदत घ्यावी लागेल हे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी रोटी घाटात हजेरी लावली आहे.. पुढे रोटी घाट पार करून हा पालखी सोहळा रोटी येथे अभंग आरती करत हिंगणीगाडा मार्गे वासुंदे येथून बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे रात्री ८ वाजताच्या दरम्यान मुक्कामासाठी पोहचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *