महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुन । उत्तर प्रदेशमध्ये सध्या इतकी भीषण उष्णता आहे की त्या उष्णतेमुळे होऊ शकणारा एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. लखनौ येथील निगोहां रेल्वे स्टेशनवर हा प्रकार घडला आहे. अतिउष्णतेने येथे रेल्वेचे रूळच वितळले आहेत.
शनिवारी सायंकाळी पाच वाजता निगोहां स्थानकावरून नीलांचल एक्सप्रेस चालली होती. जशी ट्रेन स्थानकात शिरली, तसं मोटरमनला ट्रेनला झटके बसत असल्याचं जाणवलं, त्यामुळे त्याने ताबडतोब ट्रेन थांबवून स्टेशन मास्तरांना याची सूचना दिली.
सुदैवाने लखनौपासून प्रयागराज-प्रतापगढ मार्गावर निगोहा स्थानकाच्याच मुख्य लाईनवर अन्य एक ट्रेनही उभी होती. त्यामुळे रखडणाऱ्या नीलांचल एक्सप्रेसला लूप लाईनवर टाकण्यात आलं आणि दोन्ही गाड्या खराब रेल्वे रूळ असूनही एकमेकींवर कोसळल्या नाहीत. यावेळी मोटरमनने या गाडीचा वेग अतिशय कमी ठेवला होता. त्यामुळे वितळून वाकड्या झालेल्या रेल्वे ट्रॅकवरूनही ती सुखरूप पार झाली.
रेल्वे निघून गेल्यानंतर रेल्वे अभियंत्यांनी पाहिलं की, अतिशय तीव्र उष्णतेमुळे रेल्वेरूळ वितळून वाकडा तिकडा पसरला होता. त्यामुळे ट्रेनचा अपघात होऊ शकला असता. सुदैवाने मोटरमनच्या ते वेळीच लक्षात आल्याने हा अपघात टळला आहे. या रुळांची योग्य ती देखभाल न झाल्याने ही वेळ उद्भवल्याची माहिती मिळत असून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.