पिंपरी चिंचवड शहरावर पाणीकपातीची टांगती तलवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुन । जून महिन्याचे 18 दिवस उलटले तरी, अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. पावसाळा सुरू न झाल्याने तसेच, मावळ तालुक्यातील पवना धरणाचे पाणी दिवसेंदिवस झपाट्याने घटत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी संकट ओढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सध्या दिवसाआड म्हणजे दोन दिवसांतून एकदा पाणी दिले जाते. पाणीसंकट वाढल्यास तीन दिवसांतून एकदा पाणी दिले जाऊ शकते किंवा पाणी पुरवण्याची वेळ कमी केली जाऊ शकते.

दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. यंदा मात्र, जून महिन्याचे 18 दिवस झाले तरी, पावसाला सुरुवात झालेली नाही. केवळ काही सरी अधूनमधून येतात. अद्याप पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. पाऊस येणार, असे वातावरण निर्माण होते. मात्र, तो दडी मारुन बसला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे. परिणामी, शेतातील पेरण्या खोळंबल्या आहेत.

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणार्‍या आणि पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या पवना धरणाचा साठा झपाट्याने कमी होत आहे. महापालिका धरणातून म्हणजे पवना नदीच्या रावेत बंधार्‍यातून दररोज 500 एमएलडी पाणी उचलून शहराला पुरवते. धरणात रविवार (दि.18) पर्यंत 19.68 टक्के इतका साठा शिल्लक होता.

धरणाने सध्या तळ गाठला आहे. त्यामुळे धरणाचे पात्र मोठ्या प्रमाणात कोरडे पडले आहे. सध्याचा पाणीसाठा पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 21.46 टक्के इतका पाणी साठा होता. तसेच, पावसाची दमदार सुरुवात होऊन साठा झपाट्याने वाढत होता. ऑगस्ट महिन्यात धरण 100 टक्के भरले होते.

मात्र, यंदा पावसाळा अद्याप सुरुच झालेला नाही. पावसाने दडी मारल्याने आणि धरणाचा पाणी साठा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर पाणीकपातीचे संकट निर्माण झाले आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दोन दिवसांचे पाणी एक दिवस दिले जात आहे. धरणाचे पाणी अधिक दिवस पुरावे यासाठी काटकसर म्हणून सद्य:स्थितीत दोन दिवसांऐवजी तीन दिवसांतून एकदा पाणी दिले जाऊ शकते किंवा पाण्याची वेळ कमी जाऊ शकते. त्याबाबत महापालिका प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे.

नागरिकांनी पाणी जपून वापरावे
नागरिकांनी पाणी काटकसरीने व जपून वापरावे, असे आवाहन पाटबंधारे विभाग व महापालिकेने केले आहे. घरातील गळके नळ तातडीने दुरुस्त करून घ्यावेत. घरासमोर रस्ता, अंगण, पार्किंग, जिना या ठिकाणी पाणी मारुन ते धुतले जातात. तसेच, वाहने धुतली जातात. त्यासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करू नये. नाहक पाण्याची नासाडी करू नये. तसेच, टाकी भरल्यानंतर तोटी बंद न केल्याने अनेक हाऊसिंग सोसायटी व इमारतीमध्ये टाक्या भरून पाणी वाहत असते. त्याकडे नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पालिकेच्या अनेक व्हॉल्व्हमधून पाणी गळती होत असते. पाईप गंजल्याने पाणी गळती होते. त्याकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.

शहराला दररोज 580 एमएलडी पाणी
पवना धरण 500 एमएलडी
आंद्रा धरण 50 एमएलडी
एमआयडीसी 30 एमएलडी
पवना धरणातील पाणीसाठा
रविवार (दि.18 पर्यंत) -19.68 टक्के
गेल्या वर्षी 18 जून 2022 अखेर- 21.46 टक्के
आंद्रा धरणातील पाणीसाठा – 40.13 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *