Monsoon Update: हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट ; येत्या 72 तासांत मान्सून महाराष्ट्र व्यापणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुन । मान्सूनबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. पुढील 72 तासांत मान्सून उर्वरीत महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. बिपरजॉय चक्रिवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला बसला. त्यामुळे मान्सूनची प्रगती मंदावली. सामान्यपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनपर्यंत पोहोचतो. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी एक आठवडा उशिर झाला. मान्सून 8 जूनला केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे तो महाराष्ट्रात देखील उशिरा दाखल झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

23 जूनपासून पावसाची शक्यता
मान्सून तळकोकणात दाखल झाला. मात्र त्यानंतर मान्सूनच्या वाटचालीला बिपरजॉय चक्रिवादळाचा अडथळा निर्माण झाला. मान्सूनची वाटचाल रत्नागिरी आणि गोव्यापर्यंत मर्यादीत राहिली. बिपरजॉय चक्रिवादळामुळे 11 ते 18 जूनपर्यंत मान्सूनची वाटचाल संथगतीनं सुरू होती. मात्र आता बिपरजॉयचा प्रभाव कमी झाल्यानं मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. पुढील 72 तासांत मान्सून उर्वरीत महाराष्ट्रात मुंबई, पुणे, महाराष्ट्रातील दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि इतर प्रदेश व्यापण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 23 जूनपासून मान्सून आणखी सक्रिय होईल असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान सध्या राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून चक्रिवादळाच्या प्रभावामुळे झाल्याचंही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मान्सूनला विलंब झाल्यानं यंदा त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. पेरण्याला विलंब होत असल्यानं शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *