Pune News: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी ; कर्वे रस्त्यावरील ‘नो पार्किंग’ अखेर रद्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुन । कर्वे रस्त्यावरील ‘नो पार्किंग’ सरसकट रद्द करण्याचा आणि काही भाग वगळून दोन्ही बाजूंना ‘पार्किंग’ला परवानगी देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. महापालिकेत झालेल्या संयुक्त बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी तसे आदेशही काढले. ‘गरवारे महाविद्यालयासमोरील महापालिकेच्या जागेत वाहनतळ उभारून तिथे ‘पे अँड पार्क’ करावे,’ अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कर्वे रस्त्यावरील ‘नो पार्किंग’ रद्द करण्याची मागणी पुणे व्यापारी महासंघ, कर्वे रस्ता व्यापारी संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेने केली होती. त्वरित निर्णय़ न घेतल्यास रस्ता रोको आंदोलनाचाही इशारा देण्यात आला होता.

पालिका आयुक्त विक्रमकुमार, वाहतूक उपायुक्त विजय मगर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, प्रकल्प विभागप्रमुख श्रीनिवास बोनाला, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, कर्वे रस्ता व्यापारी संघटनेचे ओमप्रकाश रांका, अजित सांगळे, महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष हेमंत संभूस, विनिता ताटके, प्रियांका पिसे, रोहित गुजर, संदीप खर्डेकर, मंदार जोशी, गजानन थरकुडे आणि कोथरूड वाहतूक पोलिस निरीक्षक विश्वास गोळे आदी उपस्थित होते.

‘संभाव्य वाहतूक कोंडी टाळून ‘कॅरेज वे’ उपलब्ध आहे, अशा भागांमध्ये वाहने पार्किंगला परवानगी द्यावी. वाहतूक कोंडी होत नसलेल्या ठिकाणांची पाहणी करून तेथील ‘नो पार्किंग’चे फलक काढावेत; तसेच भविष्यातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी गरवारे महाविद्यालयाच्या विरुद्ध बाजूला महापालिकेच्या जागेवर ‘पे अँड पार्क’ तत्त्वावर वाहनतळ सुरू करावा,’ अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.

व्यावसायिकांना दिलासा

मेट्रो प्रकल्प, दुमजली उड्डाणपूल आणि अन्य विकासकामांसाठी २०१८पासून कर्वे रस्त्यावर दुतर्फा दोन मार्गिका बंद करून ‘नो पार्किंग’ करण्यात आले होते. आता त्यातून सवलत मिळणार असल्याने येथील व्यापारी, व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. कर्वे रस्त्यावरील व्यापारी पाच वर्षे नुकसान सहन करून प्रशासनाला साथ देत होते. मात्र, आता कर्वे रस्त्यावर कोणत्याही प्रकल्पाचे काम सुरू नाही. त्यामुळे त्वरित येथील ‘नो पार्किंग’ रद्द करावे, अशी आमची मागणी होती असे संभूस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *