पहिली कसोटी रोमहर्षक वळणावर; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी हव्यात १७४ धावा, तर इंग्लंडला…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुन । इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी रोमांचक वळणावर आली आहे. इंग्लंडचा दुसरा डाव चौथ्या दिवशी २७३ धावांवर गुंडाळला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २८१ धावांचे आव्हान दिले आहे. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला ६१ धावांची दमदार सुरुवात करून दिली, परंतु ८९ धावांपर्यंत इंग्लंडने तीन विकेट्स घेतल्या अन् सामन्याला कलाटणी मिळाली.

वॉर्नर ( ३६), मार्नस लबुशेन (१३) आणि स्टीव्ह स्मिथ (६) काही विशेष करू शकले नाहीत. त्यामुळे आता पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला १७४ धावा करायच्या आहेत, तर त्याचवेळी इंग्लंडला विजयासाठी आणखी सात विकेट्स घ्याव्या लागतील. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक दोन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून ख्वाजाने ३४ धावा केल्या तर नाईटवॉचमन स्कॉट बोलँड १३ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर ३ बाद १०७ धावा केल्या आहेत.

तिसऱ्या दिवशी एजबॅस्टन मैदानावर पावसाने खेळ खराब केला आणि चौथ्या दिवशी इंग्लंडने २ बाद २८ धावांवरून खेळाला सुरुवात केली. पॅट कमिन्सने १७व्या षटकात अप्रतिम यॉर्कर टाकून ओली पोपचा त्रिफळा उडवला. त्यानंतर जो रूटला नॅथन लाएनने यष्टीचीत केले. पहिल्या डावात नाबाद ११८ धावा करणाऱ्या रूटला दुसऱ्या डावात ४६ धावा करता आल्या. हॅरी ब्रुक ( ४६), कर्णधार बेन स्टोक्स ( ४३) आणि ओली रॉबिन्सन ( २७) यांनी संघर्ष करून संघाला २७३ धावांपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि नॅथन लाएन यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी चार विकेट घेतल्या.

इंग्लंडने चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला २८१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार सुरुवात केली आणि सलामीला ६१ धावांची भर घातली. रॉबिन्सनने इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले आणि वॉर्नरला ३६ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने दोन धक्के देताना ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर फेकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *