महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या सांगलीच्या इस्लामपूर मधील राजारामबापू बँकेतून ईडीचे पथक अखेर 53 तासानंतर बाहेर पडले आहे. सांगलीतील पारेख बंधू आणि येथील काही व्यापारांवर ईडीने धाड टाकली होती. या व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. ही बँक जयंत पाटील यांच्याशी संबंधित असल्याने यावर चांगली राजकीय चर्चा रंगली आहे.
ईडीच्या पथकाने 53 तासांच्या चौकशीनंतर इस्लामपूर मधील राजारामबापू बँकेत ताबा सोडला. 53 तास ईडीचे अधिकारी आणि बँक कर्मचारी बँकेतच थांबून होते. अखेर पहाटे पाच वाजता अधिकारी आणि कर्मचारी परतले आहेत. पंधरा व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांच्या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. पारेख बंधू आणि छापा टाकण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच्या बँकेच्या खात्यात मनी लाँडरींगचा आरोप करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रात 14 ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. दहा वर्षांपूर्वीच्या एक हजार कोटी रुपयांच्या संशयीत व्यवहारांचा ईडी तपास करत आहे. या प्रकरणी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते उघडून मोठी रक्कम रोकड स्वरूपात वळती केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या आधी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर कारवाई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर या आधी देखील कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक अद्यापही तुरुंगात आहेत. तर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे नुकतेच बाहेर आले आहेत. यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची ईडीच्या वतीने चौकशी सुरू आहे.