मान्सूनने देश व्यापला:गुरुवारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुन । अनुकूल वातावरणामुळे वेगाने मार्गक्रमण करत मान्सूनने रविवारी (२५ जून) मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापला अाहे. मान्सूनने रविवारी एकाच वेळी दिल्ली-मुंबईत सलामी दिली. मुंबईत दोन आठवडे उशिराने, तर दिल्लीत दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. हा योगायोग ६२ वर्षांनंतर आला.

यापूर्वी मान्सून २१ जून १९६१ रोजी दिल्ली-मुंबईत एकाच वेळी दाखल झाला होता. महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यात मान्सून दाखल झाला आहे. रविवारपासून पुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार २९ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.

केरळमध्ये ८ दिवस उशीरा दाखल झाल्यानतंर मान्सूनने रविवारी सर्वात मोठी सलामी दिली. देशातील जवळपास २५% भू-भाग एकाच दिवसात कव्हर केला. रविवारी मान्सून यूपी, मध्य प्रदेश व महाराष्ट्र व्यापत राजस्थान, गुजरात, पंजाब, दिल्लीपर्यंत पोहोचला आणि हरियाणा, जम्मू-काश्मीरातही पुढे सरकला.

रविवारी प्रत्येक राज्यात पाऊस झाला. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र म्हणाले, मान्सून सध्या अॅक्टिव्ह मोडमध्ये आहे. २४ ते ४८ तासांत तो उर्वरित भाग व्यापणार आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर संपूर्ण देश कव्हर करण्यासाठी त्याला ३६ दिवस लागतात. यंदा केवळ १८ दिन लागण्याची शक्यता आहे. मान्सून यावर्षी ८ जून रोजी दाखल झाला आणि १७ दिवसांतच त्याने देशाचा ९०% भाग व्यापला आहे. गेल्या १५ दिवसांत मान्सूनने देशाचा ५०% भाग व्यापला होता. मात्र, शनिवारी सुमारे १५% भागात एकाचवेळी पुढे सरकला आणि रविवारी सर्वाधिक देशातील २५% भागात पुढे सरकला. यंदा पावसाळ्यात आतापर्यंत २८ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यातही मध्य आणि दक्षिण भारतात अत्यंत कमी पाऊस झाला आहे.

मुंबई-पुण्यात जोरदार हजेरी : मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबईतील चौपटी पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आली. पुणे शहरात रविवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने विविध भागात पाणी साचले होते. मुंबई आणि उपनगरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ८६ मिमी पावसाची नोंद झाली. तर सांताक्रूझ हवामान केंद्राने १७६.१ मिमी पावसाची नोंद केल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले.

अखेर कोकणात वरुणराजा बरसला : रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. जलसंकटामुळे जिल्ह्यातील १२० गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. कोयना धरणातील पाण्याची पातळीही खालावली असून वीज निर्मिती बंद करण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वीच मान्सून दाखल झाला होता. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात मोसमी पाऊस अद्याप बरसला नव्हता. तथापि, पावसाने असाच जोर कायम ठेवल्यास जलसंकट दूर होऊ शकते.

मुख्यमंत्र्यांकडून पूर नियंत्रणाचा आढावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंबईतील मिलन सबवे येथे उभारलेल्या भूमिगत पाण्याच्या टाकीच्या कामकाजाचा आढावा घेतला. शिंदे म्हणाले, “एका तासात ७० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला तरीही आम्ही विकसित केलेली प्रणाली काम करत आहे.’

मान्सूनमध्ये तेजी का?

२ दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले.
ते रविवारी आणखी मजबूत होत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले.
ते छत्तीसगड, मप्रमार्गे राजस्थान-पंजाबात जाईल.
अरबी समुद्रातही एक सर्क्युलेशन तयार झाले.
याने मान्सून पुढे सरकेल. ५ दिवस पाऊस शक्य.
मान्सूनने दाखवला दुप्पट वेग

– संपूर्ण देश व्यापण्यासाठी ३६ दिवस लागतात. यंदा १८ दिवसच लागण्याची शक्यता आहे.

– ८-९ जून रोजी दाखल झाला. पुढील १७ दिवसांत म्हणजे २५ जूनपर्यंत ९०% भाग व्यापला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *