शेतकऱ्यांना १ जुलैला वितरित होणार पहिला हप्ता ; प्रत्येकी ४००० रुपये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुन । केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर शिंदे-फडणवीस सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता राज्यातील जवळपास ७३ लाख शेतकऱ्यांना १ जुलैला वितरीत होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या योजनेचे दोन हजार तर राज्याच्या योजनेतून दोन हजार, असे चार हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहेत. पण, राज्यातील १६ लाख तर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख १६ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरणासह इतर निकष पूर्ण केलेले नाहीत.

सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख ४८ हजार ९६७ शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. त्या सर्वांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळाला होता. पण, त्यानंतर आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी, लाभार्थींच्या नावावरील मालमत्तांची एकत्रित नोंद करण्याचे बंधन घालण्यात आले. त्यात अजूनही एक लाख १६ हजार ४२८ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता सर्वांना शेवटची संधी दिली जाणार असून त्यानंतरही राहिलेल्यांची नावे कायमची योजनेतून बाद केली जाणार आहेत.

दरम्यान, आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा १४ वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळेल, त्यांनाच राज्याच्या योजनेचा पहिला हप्ता वितरित होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्याच्या योजनेचा मोठा लोकार्पण सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण दिले आहे. १ जुलैला हा कार्यक्रम होईल, अशी माहिती कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

१ जुलैला वितरित होणार पहिला हप्ता

महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून राज्यातील ७३ लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता (प्रत्येकी दोन हजार रुपये) वितरीत करण्याचे नियोजन आहे. पण, अजूनही आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी, मालमत्ता नोंदी न केलेले १६ लाख शेतकरी आहेत. त्यांना लाभ मिळणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना तत्काळ या प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘हे’ टप्पे पूर्ण करा, मग मिळेल लाभ

– आधार प्रमाणीकरण

– ई-केवायसी

– मालमत्तांची एकत्रित ऑनलाइन नोंद

जिल्ह्यातील वंचित राहणारे शेतकरी

तालुका शेतकरी

सांगोला २०,०१८

माढा १४,०१७

माळशिरस १३,६९३

पंढरपूर १२,०५९

अक्कलकोट ९,८८३

मंगळवेढा ९,६५९

द. सोलापूर ९,०६२

बार्शी ८,१४८

मोहोळ ७,९२२

करमाळा ७,९१०

उ. सोलापूर ४,०५७

एकूण १,१६,४२८

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *