मुसळधार पावसाने बळीराजा सुखावला; पेरणीच्या कामाला वेग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुन । जून महिण्यांचे तीन आठवडे काेरडे गेल्यामुळे सर्वांना मोसमी पावसाचे वेध लागले होते. चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू होता. सोमवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग आला आहे. शहरातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

मृग नक्षत्राला सुरुवात होताच मोसमी पाऊस राज्यात धकडतो. मात्र, यावर्षी मृग नक्षत्रामध्ये पाऊस आला नाही. जून महिन्यांचे चार आठवडे लोटले तरी पावसाचा पत्ता नव्हता. पावसाअभावी कापूस, सोयाबीन, धान पेरण्या लांबल्या होत्या. जिल्ह्यात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत तापमानात प्रचंड वाढ हाेवून ४५ अंशापर्यंत गेले. त्यामुळे प्रचंड उन व उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशातच गुरुवारी २२ जूनपासून जिल्हाभरात हलक्या व मध्यम सरींचा पावसाने हजेरी लावली. दोन ते तीन दिवस रिमझिम पाऊस सुरू होता.


मात्र, बळीराजाला जोरदार पाऊसाची प्रतीक्षा होती. अशातच सोमवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास जिल्हाभरात मुसळधार पाऊस पडला. सोयाबीन, कापूस व धान पिकांची लागवड करण्याची लगबग सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
जिल्ह्यात २६ ते २८ जून २०२३ पर्यंत आकाश ढगाळ राहणार असून सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वातावरणातील बदलामुळे मोसमी पावसाचे जिल्ह्यातील आगमन उशिराने झाले असले तरी शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यात चालू खरीप हंगामात ४ लाख ९० हजार हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन केले आहे. यात प्रत्येकी १ लाख ८७ हजार हेक्टर भात पिक व कापूस तर ८० हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाचा पेरा राहील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ व २५ जूननंतर अरबी समुद्रवरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वदूर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.

महापालिकेच्या स्वच्छता अभियानाची पोलखोल
पहिल्याच मुसळधार पाऊसाने महापालिकेच्या स्वच्छता व नाले सफाई अभियानाची पुरती पोलखोल झाली. गटारे व नाले तुंबल्याने रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे दुर्गंधी व घाण रस्त्यावर साचली होती. गांधी चौक, गिरणार चौक, आझाद बाग परिसर, रघुवंशी, जयंत टॅाकीज, जटपुरा गेट, रामनगर मार्ग या मुख्य मार्गावर पाणी साचले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *