महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुन । कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, तालुक्याच्या पूर्व भागात कमी झाला आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस असला तरी पूर्वेकडे तो कमी होत गेलेला आहे.
पश्चिम भागात भात व नाचणी पुनर्लागणीअगोदर मशागतीची कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहे. पूर्व भागात कधी उघडीप तर कधी दमदार पावसाच्या सरी येत आहेत. उघडीप मिळाली आणि वापसा आला की शेतकरी खरिपाच्या पेरणीची कामे करत असल्याचे दिसून येत आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत कोयनानगर व नवजाला ५६ मिलिमीटर व महाबळेश्वरला ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २०२९.१० फूट झाली असून, पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत असून, धरणाचा एकूण पाणीसाठा १०.९५ टीएमसी झाला आहे.धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने २२ जून रोजी पायथा वीजगृहातून होणारा एक हजार ५० क्यूसेस विसर्ग बंद करण्यात आला होता. तो पुन्हा सुरू करण्यात आला असून, कोयना नदीपात्रात एक हजार ५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.