Attacked On Young Girl By Koyta : दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती टळली, पोलीस ठाण्यासमोरच विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुन । प्रेम प्रकरणातून दर्शना पवार या एमपीएससी उत्तीर्ण तरुणीची हत्या झाल्याचा प्रकार ताजा असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील सदाशिव पेठ भागात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. तरुणीवर वार करत असताना तिथं उपस्थित असलेल्या दोन युवकांनी मध्यस्थी केल्याने तरुणीचा जीव वाचला आहे. त्यानंतर वार करणाऱ्या आरोपीला चोप देत पोलीस चौकीत नेण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. मुळशी) असं आरोपी तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी एक तरुणी आणि एका तरुणासोबत दुचाकीवरून पुण्यातल्या सदाशिव पेठ भागातल्या स्वाद हॉटेलच्या परिसरात आली होती. त्याठिकाणी ते दोघे एकमेकांशी बोलत बोलत असताना आरोपी शंतनू जाधव तिथं आला आणि त्याने बॅगेतून कोयता काढत दुचाकीवर असणाऱ्या तरुण-तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दुचाकीवरील तरुण आपला जीव वाचवत तिथून पळून गेला. त्यानंतर शंतनू जाधव याने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या परिसरात असलेल्या स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेत मुलीचा जीव वाचवला. त्यानंतर त्याला चोप देत पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेत दोघेही तरुण तसेच तरुणी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *